Friday, November 28, 2025

राणीबागेत चला बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन पहायला

राणीबागेत चला बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन पहायला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका, वृक्ष प्राधिकरण आणि मुंबईतील जपानचे महावाणिज्य दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच भरविण्यात आलेल्या बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शनाचे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात शुक्रवार २८ नोव्हेंबर २०२५ रोजी उद्घाटन करण्यात आले. महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी, मुंबईतील जपानचे महावाणिज्यदूत कोजी यागी, संस्कृती आणि माहिती विषयक वाणिज्यदूत शिमादा मेगुमी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ झाला.

भारतामध्ये १९७२ पासून बोन्सायची पायाभरणी करणारे आणि इंडो-जपानी असोसिएशनच्या बोन्साय स्टडी ग्रुपचे संस्थापक निकुंज पारिख, ज्योती पारिख, राजीव वैद्य, सुजाता भट, गीता कांतावाला यांच्यासह महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, संचालक (प्राणिसंग्रहालय) डॉ. संजय त्रिपाठी आदी मान्यवर उपस्थित होते. २८ नोव्हेंबर २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. मुंबईतील जपानचे महावाणिज्यदूत कोजी यागी यांनी ‘नमस्ते मुंबई’ म्हणत सादर केलेल्या मराठीतील छोटेखानी मनोगताने उपस्थितांची मने जिंकली. यागी म्हणाले, भारतातील मुंबई आणि जपानमधील योकोहामा ही दोन्ही शहरे सन १९६५ मध्ये भगिनी शहर संबंध (सिस्टर सिटी) या उपक्रम अंतर्गत जोडली गेली. या उपक्रमाला आता ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याअनुषंगाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईकरांनी या ‘इको फ्रेण्डली’ प्रदर्शनास आवश्य भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी म्हणाले, जपान आणि भारताचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. भगिनी शहर संबंध (सिस्टर सिटी) या उपक्रमाला सहा दशके झाली आहेत. वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानात भरविण्यात आलेल्या बोन्साय आणि ओरिगामी प्रदर्शनातून निसर्ग सौंदर्य आणि मानवी कलेले अविष्कार मांडण्यात आले आहेत. सतत धावपळीत असणाऱ्या मुंबईकरांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे गगराणी म्हणाले.बोन्साय प्रदर्शनात तारामणी, निलगिरी, बोधी वृक्ष, निर्गुडी, चायनीज लिंबू, चायनीज वड, नागचंपा, गुग्गुळ आदींचे लहान आकारातील रुप मांडण्यात आले आहे. तसेच ओरिगामी प्रदर्शनात विविध प्राण्यांची, पक्षी, फुलांची, अवजारांची कलाकृती साकारण्यात आली आहे. यासह अनेक विलोभनीय आणि थक्क करणाऱ्या कलाकृती केवळ कागदाचा वापर करुन साकारण्यात आल्या आहेत. यासाठी ओरिगामी मित्रा यांचे सहकार्य लाभले आहे. हे प्रदर्शन विनामूल्य आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली. या प्रदर्शनासाठी बोन्साय स्टडी ग्रुप ऑफ द इंडो-जॅपनिज असोसिएशन व ओरिगामी मित्र यांचे सहकार्य लाभले आहे. उद्घाटन समारंभानंतर अनेक अभ्यासक, विद्यार्थी, युवकांसह मुंबईकरांनी या प्रदर्शनाला भेट दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा