मुंबई (सचिन धानजी): उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील जोगेश्वरी विधानसभेत उबाठाचे आमदार म्हणून बाळा नर हे निवडून आले आहेत. परंतु या विधानसभेत उबाठाचे ते एकमेव नगरसेवक शिल्लक राहिले होते. त्यामुळे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर बाळा नर यांचा आपले जास्तीत नगरसेवक निवडून आणण्याच प्रयत्न असेल तर उबाठाचा एकमेव नगरसेवकही कमी करण्याचा प्रयत्न शिवसेना आणि भाजपाचा असणार आहे. या विधानसभेत एकही खुला प्रभाग नसल्याने आपली पत्नी, सून किंवा मुलीला निवडून रिंगणात उतरवण्याचा माजी नगरसेवकांह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर वेळ आली आहे. त्यामुळे जोगेश्वरीत शिवसेना, भाजपा पेक्षा उबाठामध्ये इच्छुकांची मोठी यादी असल्याने बंडखोरीची सर्वाधिक भीती याच पक्षाला राहणार आहे.
जोगेश्वरी विधानसभेत एकूण आठ नगरसेवकांचे प्रभाग आहेत. त्यात भाजपाच्या प्रीती सातम, पंकज यादव आणि उज्ज्वला मोडक हे तीन नगरसेवक आहेत, तर रेखा रामवंशी, प्रविण शिंदे, सदानंद परब आणि सोफिया नाझिया हे शिंदे शिवसेनेचे चार नगरसेवक आणि उबाठाचे बाळा नर हे एकमेव नगरसेवक शिल्लक राहिले होते. पण आता तेही आमदार बनले आहेत. या विधानसभेत एकही प्रभाग सर्वसाधारण खुला न झाल्याने सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. या प्रभागात पाच सर्वसाधारण महिला, दोन ओबीसी महिला आणि अनुसूचित जमाती अर्थात एसटी करता एक अशाप्रकारे राखीव प्रभाग झाले आहेत.
महिला राखीव झाल्याने या माजी नगरसेविका शिवानी शैलेश परब, सुगंधा शेट्ये, जितू वळवी, मनिषा पांचाळ आदींना पुन्हा संधी निर्माण झाली आहे. रविंद्र वायकर शिवसेनेत गेल्याने शैलेश परब यांनी पुन्हा एकदा अंधेरी जोगेश्वरीत आपले बळ निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून माजी नगरसेविका शिवानी परब यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचा विचार केल्याचे बोलले जात आहे. जोगेश्वरी विधानसभेत भाजपाला तीन जागा राखून अन्य जागांवर विजय मिळवायचा आहे, तर शिवसेनेला आपल्या जागा कायम राखण्यासाठी तारेवरील कसरत करावी लागणार आहे.
प्रभाग क्रमांक ५२ (ओबीसी महिला)
हा प्रभाग सलग दुसऱ्यांदा ओबीसी महिला राखीव झाला आहे. या प्रभागातून भाजपाच्या प्रीती सातम या मागील वेळेस निवडून आल्या होत्या. आता आरक्षणाने त्याचं प्रभाग कायम राखल्याने विद्यमान नगरसेवक म्हणून त्यांची दावेदारी प्रथम मानली जात आहे. तर उबाठाकडून माजी नगरसेविका आणि शिवसेनेतून मनसे आणि मनसेतून पुन्हा उबाठात प्रवेश केलेल्या सुगंधा शेटे यांचे नाव चर्चेत आहे. तसेच उबाठाचे शाखाप्रमुख संदीप गाढवे हे आपल्या पत्नीला उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्ना आहे. या प्रभागात खरी लढत ही भाजपा आणि उबाठा यांच्यातच होण्याची शक्यता आहे. मनसेचा प्रभाव या मतदार संघात दिसून येत नाही.
प्रभाग ५४ (एस टी)
हा प्रभाग मागील निवडणुकीत अनुसूचित जाती करता राखीव होता. या प्रभागातून शिवसेनेतून रेखा रामवंशी या निवडून आल्या होत्या. पण आता त्या शिंदे शिवसेनेत आहेत. प्रभाग आता अनुसूचित जमाती करता राखीव झाला आहे. त्यामुळे रामवंशी यांना घरी बसावे लागणार आहे. तर अनुसूचित जमाती करता म्हणजे एस टी करता राखीव झाल्याने उबाठाकडून पुन्हा माजी नगरसेवक जितेंद्र वळवी यांना संधी मिळू शकते. तर याच प्रभागात उबाठाकडून अशोक खांडवे हेही इच्छुक असल्याने दोघांमध्ये उमेदवारीबाबत स्पर्धा दिसून येणार आहे. तर काँग्रेसकडून काँग्रेसच्या आदिवासी विभागाचे मुंबई अध्यक्ष सुनील कुमरे हे आपल्या मुलीला निवडणूक रिंगणात उतरवण्यास इच्छुक आहे. हा प्रभाग शिवसेनेच्या वाट्याला येणार असल्याने जर उबाठाच्या कुणाला उमेदवारी मिळते आणि कोण नाराज होतो याकडे शिवसेनेचे लक्ष आहे. त्यामुळे शिवसेनेकडे उमेदवार नसल्यास भाजपा या जागेवर दावा करु शकते असे बोलले जात आहे.
प्रभाग क्रमांक ७२(ओबीसी महिला)
हा प्रभाग पूर्वी ओबीसी होता आणि आगामी निवडणुकीत हा प्रभाग ओबीसी महिला राखीव झाला आहे. या प्रभागातून भाजपाचे पंकज (सर) यादव हे निवडून आले होते. पण आता ओबीसी महिला प्रभाग राखीव झाल्याने त्यांच्या पत्नी ममता यादव यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यास इच्छुक आहेत. तर या प्रभागावर उबाठा शिवसेनेचा दावा असेल. उबाठाच्या वतीने समिक्षा माळी आणि माजी नगरसेविका मनिषा पांचाळ यांचीही नावे चर्चेत आहेत. तर काँग्रेसकडूून इच्छुकाच्या नावाची चर्चा अद्याप ऐकायला येत नाही.
प्रभाग क्रमांक ७३(महिला)
हा प्रभाग सर्वसाधारण खुला होता. पण आता हा प्रभाग महिला राखीव झाला आहे. या प्रभागात शिवसेनेचे प्रविण शिंदे हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यामुळे या प्रभागात शिवसेनेचा दावा असल्याने प्रविण शिंदे हे आपल्या सुनेला निवडणूक रिंगणात उतरवण्याच्या विचारात असल्याचे बोलले जात आहे. तर उबाठाकडून रोणा रावत आणि सुचित्रा चव्हाण यांच्या नावाची इच्छुक म्हणून चर्चा आहे. हा प्रभागात मनसेचा पहिला दावा असेल आणि माजी नगरसेवक भालचंद्र आंबोरे हे आपल्या पत्नीला उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्नात आहे. तर काँग्रेसच्या इच्छुकाचे नाव चर्चेत दिसून येत नाही.
प्रभाग क्रमांक ७४ (महिला)
प्रभाग महिला राखीव होता आणि या मतदार संघातून भाजपाच्या उज्ज्वला मोडक निवडून आल्या होत्या. पुन्हा हा प्रभाग महिला आरक्षित झाल्याने भाजपकडून मोडक यांचे नाव अग्रक्रमावर आहे. मोडक यांच्यासह प्रविण मर्गज हे आपल्या पत्नीसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी तयारीत असल्याचे बोलले जात आहे. तर शिवसेनेकडून दिप्ती वायकर यांचेही नाव चर्चेत आहे. तर उबाठाकडून श्रावणी मंदार मोरे यांच्या नावाची चर्चा आहे. तर काँग्रेसकडून समिता नितीन सावंत यांचेही नाव चर्चेत आहे.
प्रभाग क्रमांक ७७ (महिला)
हा प्रभाग सर्वसाधारण अर्थात खुला असून या प्रभागातून उबाठा शिवसेनेचे बाळा नर हे निवडून आले होते. पण आता बाळा नर हे जोगेश्वरीचे आमदार म्हणून निवडून आले असून हा प्रभाग महिला राखीव झाला आहे. महिला राखीव प्रभाग झाल्याने उबाठाच्यावतीने शिवानी शैलेश परब या इच्छुक आहेत. तर विश्वनाथ सावंत हे आपल्या पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवण्यास इच्छुक आहेत. याशिवाय नंदकुमार ताम्हणकर हेही आपल्या पत्नीला उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती मिळत आहे. तर शिवसेनेकडून प्रियंका आंबोळकर, रचना सावंत आणि प्राजक्ता सावंत यांच्या नावाची चर्चा आहे. या प्रभागात शिवसेना विरुध्द उबाठा अशीच लढत होणार आहे. या प्रभागात काँग्रेसच्यावतीने मोनिका प्रविण वाडेकर यांचेही नाव इच्छुकांच्या यादीत आहे.
प्रभाग क्रमांक ७८ (महिला)
हा प्रभाग ओबीसी महिला राखीव होता. या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोफिया नाझिया या निवडून आल्या होत्या. परंतु आता हा प्रभाग महिला राखीव झाला आहे. सोफिया नाझिया या आता शिवसेनेत असल्याने या प्रभागात शिवसेनेचा दावा असेल. शिवसेनेकडून नाझिया या प्रमुख दावेदार आहेत. तर हा प्रभाग मनसेला सोडला जाण्याची शक्यता आहे. या प्रभागातून मनसेचे भालचंद्र आंबोरे हे निवडून आले होते. त्यामुळे मनसेसाठी हा प्रभाग सोडला जाण्याची शक्यता आहे, पण यावर राष्ट्रवादी काँग्रेसही दावा करू शकेल. त्यामुळे मनसेचे भालचंद्र आंबोरे हे आपल्या पत्नीसाठी या प्रभागातूनही प्रयत्नशील असतील असेही बोलले जात आहेत. तर उबाठाकडून वैशाली भिंगार्डे तर काँग्रेसकडून रौफ हे आपल्या पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.
प्रभाग क्रमांक ७९ (महिला)
हा प्रभाग सर्वसाधारण अर्थात खुला असल्याने या प्रभागातून शिवसेनेचे सदानंद परब हे निवडून आले होते. पण हा प्रभाग आता महिला आरक्षित झाला आहे. महिला राखीव प्रभाग झाल्याने या प्रभागातून शिवसेनेचे सदानंद परब हे आपल्या पत्नीला निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. तर भाजपाकडून संतोष मेढेकर आपल्या वहिनीसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. तर उबाठाकडून शिवानी परब ,मानसी जुवाटकर याही इच्छुक असल्याची माहिती मिळत् आहे. या प्रभागातून शिवसेना विरुध्द उबाठा अशी लढत पाहायला मिळणार आहे.