Friday, November 28, 2025

बारामती नगर परिषदेत राष्ट्रवादीच्या आठ जणांचा बिनविरोध विजय होताच काका पुतण्यात जुंपली

बारामती नगर परिषदेत राष्ट्रवादीच्या आठ जणांचा बिनविरोध विजय होताच काका पुतण्यात जुंपली

बारामती: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना बारामती नगर परिषद सातत्याने चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ८ उमेदवारांना बिनविरोध विजय मिळाला. विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अजित पवारांच्या पक्षाच्या ८ नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी वीस कोटी रुपयांपर्यंत लाच देण्यात आल्याचा आरोप युगेंद्र पवार यांनी केला आहे. मात्र कोणतेच पुरावे दिलेले नाहीत.

न्यायालयाच्या आदेशामुळे आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्देशांमुळे दोन प्रभागांतील निवडणुका तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. प्रभाग क्रमांक १३ (ब) व प्रभाग क्रमांक १७ (अ) या दोन जागांसाठी निवडणूक आयोगाकडून सुधारित आदेश आल्यानंतरच पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे. मात्र, नगराध्यक्ष पदासह उर्वरित सर्व जागांच्या निवडणुका पूर्वनिश्चित वेळापत्रकानुसार होणार आहेत.

निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणि अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख संपल्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी नव्याने दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले. या अर्जांच्या स्वीकृतीवर तांत्रिक बाबी वरून अर्ज नामंजूर करण्यात आले होते. मात्र यानंतर भाजपचे सतीश फाळके व अविनाश गायकवाड यांनी न्यायालयात धाव घेऊन यावर याचिका दाखल केली होती. सत्र न्यायालयाने सुनावणीनंतर हे अर्ज स्वीकारण्याचे आदेश निवडणूक अधिकाऱ्यांना दिले. न्यायालयाने ‘नैसर्गिक न्याय’ तत्त्वानुसार दोन्ही अर्ज स्वीकारण्याचे आदेश दिले.

नव्या अर्जांची छाननी, अर्ज माघार प्रक्रिया आणि अंतिम मान्यता या सर्व बाबींवर राज्य निवडणूक आयोगाचे सुधारित आदेश आवश्यक आहे. तसेच नगराध्यक्ष पद आणि बाकी सर्व प्रभागांची निवडणुका नियोजित वेळापत्रकानुसारच होतील. फक्त दोन जागांची निवडणूक राज्य आयोगाचा पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित राहील, अशी माहिती निवडणूक अधिकारी डॉ. संगीता राजापूरकर यांनी दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >