Thursday, November 27, 2025

टोरेसनंतर 'वन क्लिक मल्टिट्रेड' कंपनीचा घोटाळा, गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन संस्थापक पसार

टोरेसनंतर 'वन क्लिक मल्टिट्रेड' कंपनीचा घोटाळा, गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन संस्थापक पसार

मुंबई: टोरेस घोटाळ्यापाठोपाठ दादरमध्ये आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे. विविध ऑफर्सच्या नावाखाली सुरू असलेल्या या घोटाळ्यात सुमारे दोन हजार गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. 'वन क्लिक मल्टिट्रेड' नावाच्या संस्थेने केलेल्या या घोटाळ्यातील फसवणुकीच्या रकमेचा आकडा सुमारे सव्वाचार कोटींपर्यंतचा आहे. या प्रकरणात संस्थेचे संस्थापक नामदेव बाबाजी नवले व सहकारी अलका दीपक महाडिक यांच्याविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या संस्थेतील दोन्ही आरोपी गुंतवणूक दारांचे पैसे घेऊन पसार झाले आहेत.

वडाळा परिसरात राहणाऱ्या मधुरा महेश भोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संस्थेची सहकारी अलका हीने तक्रारदार मधुरा यांच्या घरी येऊन 'वन क्लिक मल्टिट्रेड' या योजनेची माहिती दिली होती. दर महिना हजार रुपये अशी रक्कम वीस महिने गुंतविल्यानंतर एकविसाव्या महिन्यांत पंचवीस हजार परतावा आणि महिन्याच्या १६ तारखेला लकी ड्रॉ या ऑफरला बळी पडून मधुरा यांनी योजनेत गुंतवणूक केली. सुरुवातीला सर्व देयके एप्रिल २०२५ पर्यंत सुरळीत मिळत होती. त्यानंतर पैसे मिळण्यास बंद झाले. पैसा मिळत नसल्यामुळे चौकशी केल्यावर नवले यांनी पैसे शेअर मार्केटमध्ये अडकले असल्याचे सांगत वेळ मारून नेली. मात्र काही दिवसांतच दादर येथील कार्यालयाला टाळे लागल्याचे समोर आले.

तक्रारदार मधुरा भोळेच्या अंतर्गत ८२ सदस्यांनी आठ लाख एकोणावीस हजार रुपये भरले. ज्यातील केवळ २५ हजार रुपये परतावा मिळाला. मधुरा यांच्या ओळखीतून गुंतवणूक केलेल्या ३२ जणांनी या ऑफर्ससाठी अजून गुंतवणूकदारांची साखळी तयार केली. अशाप्रकारे सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त ठेवीदारांकडून गोळा केलेली रक्कम अशी सुमारे चार कोटी एकेचाळीस लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजेच संस्थेचे संस्थापक नामदेव बाबाजी नवले वेगवेगळ्या ठिकाणी भाडेतत्त्वावर कार्यालय घेऊन फसवणूकीची मालिका सुरू ठेवत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, भोईवाडा ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) नितिन महाडिक या प्रकरणाचा तपास करत असून आरोपीचा शोध सुरू आहे.

Comments
Add Comment