विरार : विरारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महापालिकेच्या गार्डनमधील तलावात खेळता खेळता पाय घसरल्याने ११ वर्षीय सार्थक मोरे या मुलाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पालिकेचा सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे
ही घटना विरारच्या फुलपाडा परिसरातील खाडग्या तलावात घडली. सार्थक खेळण्यासाठी तलावाजवळ गेला असताना त्याचा पाय घसरून तो थेट पाण्यात पडला. मात्र तलावाजवळ ना सुरक्षारक्षक, ना जीवरक्षक… त्यामुळे वेळेत मदत न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तलावाचे काम काही दिवसांपासून सुरू असून, ठेकेदाराकडून नवीन जाळी बसवण्याचे काम सुरू होते. पण प्रत्यक्षात परिसरात ना जाळी पूर्ण, ना बॅरिकेड, ना सूचना फलक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकही सुरक्षा कर्मचारी तैनात नव्हता. या गंभीर निष्काळजीपणावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.रहिवाश्यांनी थेट आरोप केला आहे की, पालिका आणि ठेकेदार यांच्या दुर्लक्षामुळेच एका निरागस मुलाचा जीव गेला. तलावावर कोणतेही नियंत्रण अथवा देखरेख नसल्याने मुलांना निर्बंधाशिवाय जागेवर फिरता येत होते, असेही नागरिकांनी सांगितले.
वसई-विरार भागातील तलावांमध्ये गेल्या काही महिन्यांत बुडून मृत्यूच्या घटना वाढल्या आहेत. तरीही महापालिकेकडून ठोस सुरक्षा उपाययोजना होत नसल्याची तीव्र नाराजी नागरिकांत आहे. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.






