सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेळगावमध्ये गुरुवारी दुपारी ४ वर्षांच्या मुलाचा ट्रॅक्टरसह विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गावात विहिरीत अडकलेली मोटार बाहेर काढण्याचे काम सुरू असताना ही दुर्घटना झाली.
याचदरम्यान जवळच खेळत असलेला शिवराज संदिप शेरखाने हा चार वर्षांचा मुलगा खेळता खेळता ट्रॅक्टरवर चढला. चुकून त्याच्या हातून गिअर सरकल्याने ट्रॅक्टरचा तोल गेला आणि क्षणार्धात तो थेट विहिरीत कोसळला. ही घटना इतकी अचानक घडली की आसपासच्या लोकांना प्रत्यक्षात काही समजायलाच वेळ मिळाला नाही. ट्रॅक्टर विहिरीत पडताच शिवराज बेचक्यात अडकल्याने त्याला वाचवणे अशक्य बनले.
अपघातानंतर शिवराजचे वडील संदिप शेरखाने यांनी मुलाला वाचवण्यासाठी तत्काळ धाव घेतली. गावातील युवकांनीही जीवाची पर्वा न करता विहिरीत उड्या मारत शोध मोहिम हाती घेतली. स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
अग्निशमन आणि पोलीस पथकाने घटनास्थळी पोहोचताच रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. मात्र ट्रॅक्टर विहिरीच्या तळाशी अडकलेला, खोल पाणी आणि चिखल यामुळे शोधकार्य अत्यंत गुंतागुंतीचे झाले. ट्रॅक्टर बाहेर काढणे शक्य नसल्याने प्रथम विहिरीतील पाणी कमी करण्याचा निर्णय घेतला. सलग १२ तासांच्या प्रयत्नांनंतर विहिरीतील पाणी बाहेर काढण्यात यश आले आणि पाणी उतरल्यावर शिवराजचा मृतदेह तळाशी दिसून आला. संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. अवघ्या चार वर्षांच्या निरागस मुलाचा झालेला मृत्यू कुटुंबासाठी आणि गावासाठी मोठा धक्का आहे.






