मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात, उपायुक्त (पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग) अविनाश काटे यांच्या देखीरेखीत वायू प्रदूषण नियंत्रणासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीत ‘रस्ते स्वच्छता व धुळ नियंत्रण मोहीम’ आयोजित करण्यात आली आहे.
येत्या २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राबविल्या जाणाऱ्या या मोहीम अंतर्गत, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कनिष्ठ पर्यवेक्षकांनी दत्तक घेतलेल्या रस्त्यांवर सखोल स्वच्छता करण्यास प्राधान्य द्यावे. यासाठी पाणी टँकर, मिस्टिंग मशीन तसेच अन्य यांत्रिक उपकरणे व संयंत्रांचा वापर करावा. प्रामुख्याने वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) अधिक असलेले बोरिवली (पूर्व), मालाड (पश्चिम), चकाला – अंधेरी (पूर्व), देवनार, माझगाव, नेव्ही नगर – कुलाबा, मुलुंड (पश्चिम), पवई या परिसरातील वायू निर्देशांकांत सुधारणा होईल, यादृष्टीने व्यापक स्वच्छता करावी. विभाग स्तरावर कार्यरत असलेले घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंते यांनी या संपूर्ण मोहिमेचे काटेकोरपणे पर्यवेक्षण करावे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. या कनिष्ठ पर्यवेक्षक अर्थात जेओंच्या माध्यमातून ७५० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची पाण्याने धुवून स्वच्छता केली जाणार आहे. ही मोहिम पुढील तीन दिवस चालणार आहे.