Thursday, November 27, 2025

पंतप्रधान मोदी कर्नाटक आणि गोव्याचा दौरा करणार, ७७ फुटी श्रीराम मूर्तीचे अनावरण करणार

पंतप्रधान मोदी कर्नाटक आणि गोव्याचा दौरा करणार, ७७ फुटी श्रीराम मूर्तीचे अनावरण करणार
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार २८ नोव्हेंबर रोजी कर्नाटक आणि गोव्याला भेट देणार आहेत. सकाळी साडे अकराच्या सुमाराला पंतप्रधान कर्नाटकातील उडुपी येथील श्रीकृष्ण मठाला भेट देणार आहेत. त्यांनतर ते गोव्याला जाणार आहेत. गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या ५५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 'सार्ध पंचशतमानोत्सव' सोहळ्यानिमित्त पंतप्रधान दुपारी सव्वा तीनच्या सुमारास मठाला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदींचा उडुपी दौरा पंतप्रधान उडुपी येथील श्रीकृष्ण मठाला भेट देणार असून लक्षकंठ गीता पारायणात सहभागी होणार आहेत. या आध्यात्मिक कार्यक्रमाला विद्यार्थी, साधू, विचारवंत आणि समाजातील विविध स्तरातील नागरिक मिळून सुमारे एक लाख जण उपस्थित राहणार असून ते एका स्वरात श्रीमद भगवद गीतेचे पठण करणार आहेत. याशिवाय पंतप्रधानांच्या हस्ते कृष्णा गर्भगृहासमोरील सुवर्ण तीर्थ मंडपाचे उद्घाटन होणार आहे आणि पवित्र कनकाना किंदीसाठी तयार करण्यात आलेल्या कनक कवचाचे समर्पण देखील त्यांच्या हस्ते होणार आहे. ही एक पवित्र खिडकी आहे त्यातून संत कनकदास यांना भगवान कृष्णाचे दिव्य दर्शन झाले असे मानले जाते. उडुपी येथील श्रीकृष्ण मठाची स्थापना आठशे वर्षांपूर्वी वेदांताच्या द्वैत तत्वज्ञानाचे संस्थापक मध्वाचार्य यांनी केली होती. पंतप्रधान मोदींचा गोवा दौरा गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या ५५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 'सार्ध पंचशतमानोत्सव' सोहळ्यानिमित्त पंतप्रधान दक्षिण गोव्यातील कानाकोना येथील मठाला भेट देणार आहेत. श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ परिसरात उभारण्यात आलेल्या प्रभू श्रीराम यांच्या ७७ फूट उंचीच्या कांस्य पुतळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण होणार असून मठाने विकसित केलेल्या "रामायण थीम पार्क उद्यानाचे' देखील ते उदघाटन करतील. यावेळी पंतप्रधान एका खास टपाल तिकिटाचे आणि स्मृती नाण्याचे अनावरण करतील, तसेच उपस्थितांना संबोधितदेखील करतील. श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ हा पहिला गौड सारस्वत ब्राह्मण वैष्णव मठ आहे. येथे १३ व्या शतकात जगद्गुरु मध्वाचार्य यांनी स्थापित केलेल्या द्वैत व्यवस्थेचे पालन केले जाते. मठाचे मुख्यालय कुशावती नदीच्या काठावर दक्षिण गोव्यातील एका लहानशा शहरात पर्तगाळी येथे आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा