भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी
पुरुष वेगळा प्रकृतीहून। हे कपिलांचे तत्त्वदर्शन।।
भगवान कपिलांचा ‘पुरुष’ हा शब्द ‘स्त्री-पुरुष’ यामधला पुरुष नसून ‘प्रकृती-पुरुष’ यातला पुरुष आहे. प्रत्येक जीवात्मा हा पुरुष आणि जगताभास निर्माण करणारी ती प्रकृती होय. जेव्हा हा जिवात्मा या जगताभासापासून अलिप्त होऊन स्वतःकडे पाहील म्हणजे आत्मदर्शन घेईल तेव्हा त्याला स्वतःच्या अनादिअनंत चैतन्य स्वरूपाचे ज्ञान होईल. तो प्रकृतीच्या जगतबंधातून मुक्त होईल, असे अनमोल तत्त्व भगवान कपिलांनी प्रस्थापित केले आहे.
ब्रह्मदेवाने कर्दम ऋषींना प्रजा उत्पन्न करण्याची आज्ञा केली. तेव्हा उत्तम प्रजोपत्तीसाठी कर्दम ऋषी प्रथम सरस्वतीच्या निर्मळ परिसरात तप करण्यास गेले. नदीच्या परिसरात एक सरोवर होते, त्या सरोवराजवळ आश्रम बांधून तेथे कर्दम ऋषींनी दीर्घ काळ उग्र तपश्चर्या केली. तपामुळे अतिशय शुद्ध झालेल्या चित्ताने ते श्रीहरीची अखंड आराधना करू लागले. त्यामुळे श्रीहरी प्रसन्न होऊन तेथे प्रकटले. कर्दम ऋषींचा उत्कट भक्तिभाव पाहून श्रीहरीचेही अंतःकरण भक्तवात्सल्याने भरून आले आणि श्रींच्या नेत्रातून अश्रू बिंदू वाहू लागले ते अश्रू बिंदू तेथील सरोवरात पडले. त्यामुळे त्या सरोवराला बिंदू सरोवर असे नाव पडले.
कर्दम ऋषींजवळ येऊन भगवंताने आपण स्वतः कर्दम ऋषींचा पुत्र म्हणून अवतार घेऊ, असे त्यांना सांगितले. तसेच या सार्वभौम मनुराजा स्वतः येथे येऊन आपली कन्या तुला अर्पण करेल, तिचा स्वीकार करावा, असेही भगवंतांनी कर्दम ऋषींना सांगितले. भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे स्वायंभुव मनू व त्यांची धर्मपत्नी शतरूपा आपल्या कन्येसह कर्दम ऋषींच्या आश्रमात आले, त्यांच्या विनंतीला मान देऊन कर्दमांनी मनुकन्या देवहुती हिच्याशी विवाह केला. देवहुती राजकन्या असूनही वनवासी, निष्कांचन पतीची निष्ठेने सेवा करीत होती. पण त्यामुळे ती स्वतः अतिशय कृश झाली होती. तिच्या सेवावृत्तीने प्रसन्न झालेल्या कर्दम ऋषींनी तिच्या इच्छेप्रमाणे आपल्या योगसामर्थ्याने दासदासींनी युक्त असे राजवैभव व हिरेजडित विमान उत्पन्न केले. त्यातून विहार करताना कर्दम-देवहुतीला नऊ कन्या व एक पुत्र यांचा लाभ झाला. हा पुत्र म्हणजेच भगवंतांचा पाचवा अवतार कपिल होय. आपल्या उपवर झालेल्या नऊ कन्यांचा विवाह कर्दमांनी पुढील ऋषींशी केला. कला ही कन्या मरीची ऋषींना दिली, त्याप्रमाणे हविर्भू - पुलस्य, ख्याती = भृगू, अनसूया - अत्री, गति - पुलह, अरुंधती - वसिष्ठ, श्रद्धा - अंगिरा, क्रिया - ऋतू, शांती - अथर्वा याप्रमाणे आपल्या कन्यांचे विवाह केले आणि आपली धर्मपत्नी देवहुती हिच्या रक्षणाची जबाबदारी पुत्र कपिल यांच्यावर सोपवून कर्दम ऋषींनी संन्यास घेतला. पिता अरण्यात गेल्यावर भगवान कपिल बिंदू सरोवराच्या तीरी आपल्या मातेजवळ राहिले. त्यांची माता देवहुती हिने सर्वोत्तम राजवैभव व वनातील निष्काचन अवस्था या दोहोंचा अनुभव घेतला होता. आता ती सधन - निर्धन द्वन्द्वातून बाहेर येऊन वैराग्यशील बनली होती. आपला पुत्र हा परमेश्वरी अवतार आहे, हे तिला ज्ञात असल्याने तिने कपिलमहामुनींजवळ आत्मज्ञानाची विनंती केली. मातेची ही मुमुक्षूवृत्ती पाहून कपिल मुनींना आनंद वाटला. त्यांनी मंदहास्य करीत म्हटले,
योग आध्यात्मिकः पुंसां मतो निःश्रेयसाय मे। अत्यन्तोपरतिर्यत्र दुःखस्य च सुखस्य च ।। भा.स्कं ३अ. २५.१३
माते, मनुष्याच्या अत्यंतिक कल्याणाचे साधन म्हणजे परमात्म्याची प्राप्ती करून देणारा योग होय. कारण हा योग प्राप्त झाला असता संसारदुःखाची व विषयसुखाची निवृत्ती होते, असे सांगून कपिल महामुनी पुढे म्हणाले, “या आत्म्याला बंध किंवा मोक्ष प्राप्त होण्याला कारण अंतःकरण होय. ते विषयांवर आसक्त झाले, तर बंधाला कारण होते आणि ईश्वराच्या स्वरूपी रममाण झाले, तर मोक्षाला कारण होते. ममत्व व अहंकार हे विकार नष्ट झाल्यास अंतःकरण शुद्ध होते. मग त्यात ज्ञान, वैराग्य व भक्ती उत्पन्न होतात’’ कपिल महामुनींचे हे बोल ऐकून देवहुतीने सहज बोध होईल अशा योगमार्गाचे विवरण करण्यास त्यांना सांगितले. त्यावर अतिशय प्रेमादराने कपिल मुनींनी प्रकृतीच्या चोवीस तत्त्वांचे निरूपण ज्यात आहे, अशा संख्याशास्त्राचे विवेचन देवहुतीसाठी केले (पूर्वार्ध) anuradha.klkrn@gmil.com






