‘इंग्लिश क्रिकेटचा मृत्यू झाला!’ क्रीडा पत्रकार रेगिनाल्ड शर्ली ब्रूक्स यांनी ‘द स्पोर्टिंग टाइम्स’ साप्ताहिकात १४३ वर्षांपूर्वी हे उपहासाने लिहिले. त्यांच्या या विनोदी ढंगातील मृत्युलेखातून ‘अॅशेस’चा जन्म झाला. भारतीय क्रिकेटसाठीही तीच वेळ आलेली दिसते. गुवाहाटीमध्ये दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विक्रमी धावांनी पराभूत झालेल्या या संघाच्या ‘कामगिरी’ची येते काही दिवस चिरफाड होत राहणार. वर्षभरातच घरच्या मैदानावर दोन संघांकडून न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका - भारताला ‘व्हाईट वॉश’ मिळाला. त्यामुळे आता रंगसफेदी नव्हे तर रंगरंगोटी आवश्यक आहे. मालिकेतील दुसऱ्या पराभवाची चाहूल सामन्याच्या चौथ्या दिवशीच लागली. परिणामी सामाजिक माध्यमांवर मिम्सचा महापूर सुरू झाला. ते पाणी आज डोक्यावरून गेले. इतिहासातील सर्वांत मोठा, म्हणजे ४०८ धावांनी पराभव. दक्षिण आफ्रिकेने दुसरा डाव थोडा लवकर घोषित केला असता, तर या पराभवाची नोंद कदाचित चौथ्या दिवशीच झाली असती. पराभवाचे अंतर थोडे कमी असले असते. पाहुण्यांनी डाव लवकर का घोषित केला नसावा? पत्रकारांनी विचारलेच. प्रशिक्षक शुकरी कॉनरॅड त्यावर म्हणाले, ‘आम्हाला त्यांना पुरते लोळवायचे होते!’ यजमानांनी पाहुण्यांच्या इच्छेचा मान राखलेला दिसतो. ‘अतिथी देवो भवः’ संस्कृतीला साजेसाच खेळ भारतीय क्रिकेटपटूंनी दोन्ही सामन्यांमध्ये केला. आपल्या फिरकी गोलंदाजांच्या तालावर परदेशी खेळाडू नाचत, हा इतिहास. आता स्वदेशातील खेळपट्ट्यांवर परदेशी फिरकी गोलंदाज भारतीय फलंदाजांना ‘ता-ता थैया, ता-ता थैया’ करायला लावतात. आधीच्या १२ कसोटी सामन्यांमध्ये एकदाच पाच बळी घेता आलेल्या सायमन हार्मर याला आपण १७ बळींची भेट दिली. हे ताजे वर्तमान पचायला आणि रुचायला कठीणच.
आपण नेहमी जिंकत(च) राहावे, अशी भारतीय चाहत्यांची अपेक्षा बनली आहे. एखादाही पराभव त्यांना सहन करता येत नाही, हे वेळोवेळी दिसतेच. खेळात हार-जीत चालायचीच, हे तत्त्वज्ञान केवळ कागदावरती आणि सांगण्यापुरते राहिले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव तेवढ्यामुळेच टोचतो, असे मुळीच नाही. अतिशय बेजाबदारपणे खेळून भारताने दोन्ही सामने गमावलेले आहेत. हंगामी कर्णधारपदाची जबाबदारी लाभलेला ऋषभ पंत या कसोटीतील दोन्ही डावांत कसा खेळला आणि कसा बाद झाला हे पाहिल्यावर ते लक्षात येते. संघातील अनुभवी फलंदाज के. एल. राहुल, ध्रुव जुरेल यांनी मैदानावर टिकून राहण्याची क्षमता दाखविली नाही. प्रत्येक सामन्यात ‘मन की खुशी, दिल का राजा’ पद्धतीने खेळलास तर तुझी जागा धोक्यात येईल, असे यशस्वी जयस्वाल याला कोणी सांगितले की नाही? सामना वाचविण्यासाठी खेळपट्टीवर उभे राहण्याची गरज असताना नितीशकुमार रेड्डी रीव्हर्स स्वीपचा गंमतीदार प्रयोग करत होता. प्रतिस्पर्धी संघाचे सामर्थ्य, आपल्या मर्यादा, संधी साधणे आणि धोके ओळखणे यात संघ पूर्णपणे अपयशी ठरला. धावफलक नेहमीच गाढव असतो का? तर मुळीच नाही. पूर्ण मालिकेत शंभराहून अधिक धावा करणारे दोनच भारतीय फलंदाज वॉशिंग्टन सुंदर (१२४) व रवींद्र जाडेजा (१०५). हे दोघेही पूर्ण वेळ फलंदाज नाहीत, हे लक्षात घेतले की, सलामीवीरांचे आणि मधल्या फळीचे अपयश ठसठशीत दिसते. मालिकेत सर्वाधिक चेंडू खेळला तो सुंदरच. चार वेळा सर्व गडी गमावणाऱ्या यजमान संघाकडून दोनच अर्धशतके - यशस्वी जयस्वाल व जाडेजा. आपल्या दोनच फलंदाजांची सरासरी पंचवीसहून अधिक. दक्षिण आफ्रिकेकडून एक शतक, तीन अर्धशतके झाली. या सर्व खेळात सामना जिंकून देणाऱ्या त्यांच्या सात फलंदाजांनी मालिकेत शंभराहून अधिक धावा केल्या आणि चौघांची सरासरी तीसहून अधिक. घरच्या मैदानावर, आपल्याला हव्या तशा खेळपट्ट्या बनविण्याचा आदेश दिल्यानंतरही मालिकेत पाहुण्यांच्या गोलंदाजांचा वरचष्मा दिसतो. दोन सामन्यांतील चार डावांमध्ये फक्त एकदाच यजमानांना दोनशेचा उंबरठा ओलांडता आला. एकदा तर शंभराच्या आत डाव आटोपला. खेळपट्टीत काही विशेष नाही, असे कुलदीप यादव सांगतो. आपले फलंदाज मात्र मार्को यान्सेन आणि हार्मर यांच्यापुढे शरणागती पत्करतात. हा फरक वृत्तीतला आहे. मालिकेत भारताने सात झेल सोडले. पाहुण्यांकडून दोन सुटले. त्याबद्दल पश्चात्ताप करण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या मनमानी कारभारामुळेच भारतीय संघाची ही अवस्था झाली. कसोटी विश्वविजेत्यापदाच्या तालिकेत भारतीय संघाची आता पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी प्रथम श्रेणी सामन्यात खेळले पाहिजे, असा मानभावी सल्ला देण्यात आला. पण याची निवड करताना देशातील स्पर्धांमध्ये केलेल्या कामगिरीचा विचार होतो का? रणजी आणि इराणी करंडक जिंकणाऱ्या विदर्भाच्या संघातील खेळाडूंना हे विचारले पाहिजे. हर्षित राणाचा संघात समावेश कसा काय होतो बुवा, असा प्रश्न माजी कर्णधार के. श्रीकांत यांनी जाहीरपणे विचारला. त्याचे उत्तर देताना त्यांचे बोट कोणाकडे रोखले होते, हे मंडळातील धुरिणांनी पाहायला हवे. एका सामन्यात तीन यष्टिरक्षक, तीन डावखुरे फिरकी गोलंदाज, कथित अष्टपैलू खेळाडूंचा भरणा, राणाला १० षटकेही गोलंदाजी न देणे हे आणि असे बरेच विनोद मालिकेत झाले आहेत. गंभीर कालपर्यंत विचारत होते, ‘पराभवाबद्दल मला का ट्रोल करता? मी मैदानात जाऊन जिंकून देऊ की काय?’ आजच्या पराभवानंतर फरक एवढाच पडलेला दिसतो की, त्यांनी पराभवाची नैतिक वगैरे म्हणतात ती जबाबदारी स्वीकारलेली आहे. प्रशिक्षकपदाच्या छोट्या कारकिर्दीत त्यांनी गांभीर्याने केलेल्या काही मोजक्या विधानांपैकी हे एक! त्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थातच गंभीरपणे दखल घ्यायला हवी. अश्विन, रोहित आणि विराट यांना सन्मानाने निवृत्त होण्याची संधी न देणाऱ्यांची हकालपट्टी करणे, हेच तातडीचे औषध आहे.






