Thursday, November 27, 2025

Gauri Garje Case : अनंत गर्जेला २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Gauri Garje Case : अनंत गर्जेला २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Gauri Garje Case : महाराष्ट्रात खळबळ माजवणाऱ्या डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या आत्महत्येप्रकरणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे याला २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. न्यायालयाने हा आदेश दिला आहे. अनंत गर्जे हा डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या आत्महत्या प्रकरणातला मुख्य संशयित आरोपी आहे.

डॉ. गौरी गर्जेने राहत्या घरात आत्महत्या केल्याची माहिती उघड झाल्यानंतर सुरू झालेल्या तपासात अनेक नवीन बाबी समोर येत आहेत. प्राथमिक पोस्टमॉर्टम अहवालानुसार, गौरीच्या गळ्यावर दाब पडल्याचे तसेच तिच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचे नमूद झाले आहे. केवळ गौरीच नव्हे, तर अनंत गर्जेच्याही शरीरावर खुणा आढळल्या असल्याने ही घटना नेमकी कशामुळे घडली, यावर नवीन प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याशिवाय पोलिसांना मिळालेल्या कॉल रेकॉर्डिंग्स आणि घरातील सीसीटीव्ही फूटेजमध्ये काही संशयास्पद बाबी असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले आहे. या सर्व पुराव्यांची सखोल तपासणी करण्यासाठी अधिक वेळ आवश्यक असल्यामुळे अनंत गर्जेची कोठडी वाढवण्यात आली आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, गौरीच्या पतीसोबत नणंद शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांवर मारहाण, मानसिक छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोप ठेऊन बीएनएसच्या १०८, ८५, ३५२, ३५१(२) या कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गौरी गर्जे यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या जबाबात, गौरीला किरण नावाच्या व्यक्तीच्या पहिल्या पत्नीच्या गर्भधारणेबाबतची काही कागदपत्रे मिळाल्यानंतर ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली होती, अशी माहिती दिली आहे. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, पोस्टमॉर्टम अहवाल, जखमांचे स्वरूप, मोबाईलमधील संभाषण आणि सीसीटीव्ही फूटेज यांच्या आधारे पुढील महत्त्वाचे खुलासे समोर येऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment