हाँगकाँग: हाँगकाँगमधील ताईपो भागातील एका निवासी संकुलाला काल (२६ नोव्हेंबर) दुपारी भीषण आग लागली. या अग्नितांडवात आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू झाला असून जखमींची संख्या मोठी आहे. तर ३०० जणांचा शोध अजून सुरू आहे. या आगीचे प्रमाण एवढे जास्त होते की, आगीचे लोट शहरभर पसरले. मात्र अचानक एवढी आग कशी लागली, याबद्दल कोणतीच माहिती अद्याप मिळाली नसून याबाबत तपास सुरू आहे. या घटनेचे धक्कादायक व्हिडिओ पाहून आगीची दाहकता लक्षात येते.
मिळालेल्या माहितीनुसार, हाँगकाँगच्या वांग फुक कोर्ट निवासी संकुलात ही आग लागली. या संकुलात एकूण एकतीस माळ्याच्या आठ गगनचुंबी इमारती आहेत. ज्यात अंदाजे २००० घरं असून चार हजारहून अधिक जण वास्तव्यास आहेत. स्थानिक वेळेनुसार ही आग दुपारी २ वाजून ५१ मिनिटांनी लागली. धूराचे लोट, इमारतीची उंची आणि अरुंद जिने हे बचावकर्त्यांसाठी मोठे आव्हान असल्यामुळे बचाव कार्याला मर्यादा येत आहेत. यामुळे कोणताही अधिकृत आकडा सांगणे कठीण असल्याचे हाँगकाँग सरकारने सांगितले.
घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या १४० गाड्या घटनास्थळी पोहचल्या. अग्निशमन दलाचे ७०० पेक्षा अधिक जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र ही आग एवढी तीव्र होती की, आज सकाळपर्यंत संकुलातून धूर येणे थांबले नाही आहे. परिस्थितीची तीव्रता लक्षात घेवून, अग्निशमन सेवा विभागाने 'लेव्हल ५ अलार्म फायर' घोषित केले. आगीसंदर्भात ही सर्वात गंभीर श्रेणी आहे. या दुर्घटनेतील मृतांमध्ये ३७ वर्षीय अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याचा समावेश आहे.






