नवी दिल्ली : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील संघर्ष आता राज्यातील मठांपर्यंत पोहोचला आहे. मुख्यमंत्रिपदासाठी सुरू झालेला हा संघर्ष हळू हळू तीव्र होऊ लागला आहे. या संघर्षामुळे काँग्रेसचे कर्नाटकमधील राजकीय समीकरण बिघडण्याची शक्यता वाढली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे दोघेही स्वतःचा गट मबजूत करण्यासाठी तसेच प्रतिस्पर्धी गटाला कमकुवत करण्यासाठी शह काटशहचे राजकारण करू लागले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतिस्पर्धी आमदारांना स्वतःच्या गटात ओढण्यासाठी ५० कोटी रुपये, फ्लॅट, लक्झरी कार अशा स्वरुपाची आमिषं दिली जात आहेत.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील संघर्षात आता वोक्कालिगा समाजाचा आदिचुंचनगिरी मठ ओढला गेला आहे. आदिचुंचनगिरी मठाचे प्रमुख निर्मलानंद नाथ स्वामी यांनी जाहीररित्या डी. के. शिवकुमार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी काँग्रेसला निर्वाणीचा इशाराही दिला आहे. तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या समर्थकांनी दलित आणि ओबीसी नेत्यांना आपल्या बाजूला ओढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्ता स्थापनेवेळी सिद्धरामय्या अडीच वर्ष मुख्यमंत्री राहतील नंतर हे पद डी. के. शिवकुमार यांना दिले जाईल, असा तोंडी करार झाला होता. पण अडीच वर्ष उलटली तरी सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पद सोडलेले नाही. यामुळेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे ओबीसी गटातील कुरुबा समाजाचे प्रतिनिधित्व करतात तर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे वोक्कालिगा समाजाचे प्रतिनिधित्व करतात. राजकीय संघर्ष वाढला तर कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या मतपेढीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे काँग्रेसच्या नेत्यांवर कर्नाटकचा राजकीय पेच सोडवण्यासाठीचा दबाव वाढत चालला आहे.






