Thursday, November 27, 2025

Nashik Crime : ७ पानी सुसाइड नोट! अवघ्या ५ महिन्यांपूर्वी गृहप्रवेश झाला, अन् सासरच्या छळाला कंटाळून नववधूची आत्महत्त्या!

Nashik Crime : ७ पानी सुसाइड नोट! अवघ्या ५ महिन्यांपूर्वी गृहप्रवेश झाला, अन् सासरच्या छळाला कंटाळून नववधूची आत्महत्त्या!
नाशिक : नाशिक शहरातील हिरावाडी परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पतीसह सासरच्या नातेवाइकांकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून एका नवविवाहित महिलेने विष प्राशन करत आपले जीवन संपवले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून, महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांवरून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आत्महत्या केलेल्या या नवविवाहितेचे नाव नेहा संतोष पवार (बापू डावरे, वय २४, रा. हिरावाडी) असे आहे. आत्महत्येपूर्वी नेहा यांनी तब्बल सात पानांची एक सविस्तर चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीमध्ये त्यांनी पतीसह सासरच्या नातेवाइकांकडून होणारा मानसिक आणि शारीरिक छळ, तसेच त्यांच्यावर झालेले अन्याय याचा संपूर्ण पाढा वाचला आहे. या सात पानी चिठ्ठीतील मजकूर इतका वेदनादायक आहे की, तो वाचून कोणाच्याही डोळ्यात अश्रू तरळतील. नेहा यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केलेल्या वेदना आणि तिला सहन करावा लागलेला त्रास यावरून सासरच्या मंडळींनी तिला किती छळले असेल, याचा अंदाज येतो. गेल्या काही महिन्यांपासून महिलांविरोधातील अत्याचारात वाढ होत असताना, नाशिकमधील या घटनेने प्रशासनासमोर आणि समाजासमोर गंभीर प्रश्न उभे केले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून, मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

२४ वर्षीय नवविवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार, मृत नेहा संतोष पवार (बापू डावरे) हिचा विवाह जून महिन्यात संतोष पवार नावाच्या युवकासोबत झाला होता. हळदीच्या समारंभानंतर मोठ्या उत्साहात लग्न करून ती सासरी आली, गृहप्रवेश झाला आणि तिथेच तिच्या आयुष्यातील छळाला सुरुवात झाली, असे तिने चिठ्ठीत नमूद केले आहे. या ५ महिन्यांच्या काळात नेहाचा पती संतोष पवार, सासू आणि नणंदेकडून तिचा विविध कारणांवरून शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. विशेष म्हणजे, नेहा माहेरच्या लोकांशी फोनवर गप्पा मारते, असे सांगून तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला, ज्यामुळे तिचा मानसिक त्रास अधिक वाढला. सासरच्या मंडळींनी केलेल्या या सततच्या जाचाला कंटाळून बुधवारी नेहाने राहत्या घरी विष प्राशन करून आपले जीवन संपवले. अत्यंत दुर्दैवी अशा या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, या चिठ्ठीतील तपशीलांच्या आधारे कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

५ महिन्यांतच 'कौमार्य चाचणी'सह अनन्वित छळ

नाशिकमध्ये अवघ्या ५ ते ६ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या एका नवविवाहितेच्या आत्महत्येने सासरच्या क्रूरतेची हद्द पार झाल्याचे उघड झाले आहे. मृत नेहा पवार यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सात पानी चिठ्ठीत सासरच्या मंडळींच्या अमानुष छळाचा आणि अत्याचाराचा धक्कादायक उल्लेख केला आहे. या चिठ्ठीतील सर्वात गंभीर आरोप म्हणजे, नेहा यांचा पती आणि नणंदेकडून त्यांची 'कौमार्य चाचणी' करण्यासारखा क्रूर प्रकार करण्यात आला होता. याशिवाय, सासरच्या मंडळींकडून वारंवार माहेरून पैसे आणण्याची मागणी केली जात होती. नेहा यांचा पती संतोष पवार याने लग्नापूर्वीच्या एका तरुणीसोबतच्या प्रेमसंबंधाचे अश्लील फोटो नेहा यांना दाखवून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती. तसेच, पती, सासू आणि नणंदेकडून नेहा यांच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेतला जात होता. या सगळ्या मानसिक त्रासाला कंटाळून नेहा यांनी लग्नानंतर अवघ्या ५-६ महिन्यांतच आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. हा त्रास सहन न झाल्याने बुधवारी नेहाने घरातच विष प्राशन करून आपले जीवन संपवले. सासरचे लोक पुरावे नष्ट करतील या भीतीने, नेहा यांनी ७ पानांची चिठ्ठी लिहिल्यानंतर तिचे फोटो काढून आपल्या भावाला पाठवले होते, अशी माहिती आता उघड झाली आहे. या महत्त्वाच्या पुराव्याच्या आधारे नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात पती, सासू आणि नणंदेकडून छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >