मुंबई : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार २०२६ या वर्षासाठी आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक सहाय्यता संस्था अर्थात इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रॅसी अँड इलेक्ट्रोल आसिस्टस (आयडीईए) या आंतर-सरकारी संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारणार आहेत. ३ डिसेंबर २०२५ रोजी स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे होणाऱ्या सदस्य देशांच्या परिषदेत ते औपचारिकरीत्या अध्यक्षपद स्वीकारतील. आगामी वर्षभर ते या संस्थेच्या सर्व महत्त्वाच्या परिषदांचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.
१९९५ मध्ये स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय आयडीईए ही संस्था जगभरातील लोकशाही प्रक्रियेचे बळकटीकरण करण्यासाठी कार्यरत आहे. सध्या ३५ देशांचे या संस्थेचे सदस्यत्व असून अमेरिका आणि जपान हे निरीक्षक देश आहेत. समावेशक, लवचिक आणि जबाबदार लोकशाही व्यवस्थांचा प्रसार हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. अध्यक्षपद मिळणे हा भारताच्या निवडणूक आयोगाच्या जागतिक प्रतिष्ठेचा मोठा सन्मान मानला जात आहे.
जगातील सर्वात विश्वसनीय आणि अभिनव निवडणूक व्यवस्थापन संस्थांपैकी एक म्हणून भारताच्या निवडणूक आयोगाची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख आहे. भारत हा आयडीईएचा स्थापक सदस्य असून विविध लोकशाही उपक्रमांमध्ये त्याचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे.
अध्यक्ष म्हणून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा जगातील सर्वात मोठ्या निवडणुकांचे आयोजन करण्यातील भारताचा अनुभव हा संस्थेच्या जागतिक कार्ययोजनेत वापरण्याचा मानस आहे. निवडणूक व्यवस्थापन संस्था यांच्यात ज्ञान-विनिमय, व्यावसायिक नेटवर्किंग आणि पुराव्यावर आधारित जागतिक निवडणूक सुधारणा यांना या सहकार्यातून गती मिळणार आहे. जवळपास एक अब्ज मतदार असलेल्या भारताची पारदर्शक आणि सुबद्ध निवडणूक प्रक्रिया ही जगासाठी आदर्श मानली जाते. आगामी वर्षभर भारत आपल्या उत्तम पद्धती आणि अनुभव आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देणार आहे.
स्थापनेपासून आयआयडीईएमने भारतासह जगभरातील निवडणूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. संस्थेने आतापर्यंत २८ देशांबरोबर सामंजस्य करार केले असून १४२ देशांतील ३१६९ निवडणूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.






