हाँगकाँग : हाँगकाँगमधील Tai Po District मध्ये बुधवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण शहर हादरलं आहे. या घटनेत आतापर्यंत ५५ जणांचा मृत्यू झाला असून, २७९ लोक अजूनही बेपत्ता आहेत, असे अधिकृत माहितीवरून कळत आहे. हे हाँगकाँगमधील ३० वर्षातील सर्वात मोठे अग्नितांडव आहे.
आग ३२ मजली निवासी इमारतीच्या बाहेरील बांबूच्या ज्वलनशील स्कॅफोल्डिंगमधून सुरू झाली, जिथे इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सुरू होते. इमारतीवर लावलेल्या सुरक्षा जाळ्या, वेगवान वारा आणि ज्वलनशील साहित्य यांच्या संयोगामुळे आग काही मिनिटांतच मोठ्या प्रमाणावर पसरली. जवळील आठ टॉवरच्या गृहनिर्माण संकुलातील सात इमारतींमध्ये आग पसरली आणि जवळपास २००० फ्लॅट्स जळून खाक झाले.
हाँगकाँग पोलिसांनी आगीशी संबंधित तीन जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गंभीर आरोप आहेत. अटक केलेले तिघे लोक बांधकाम कंपनीचे अधिकारी आहेत, ज्यांच्यावर इमारतींच्या नूतनीकरणासाठी वापरल्या गेलेल्या ज्वलनशील साहित्याबाबत गंभीर निष्काळजीपणा केल्याचा आरोप आहे. यात दोन संचालक व एक प्रकल्प सल्लागार आहे.
हाँगकाँग अग्निशमन विभागाने १४० पेक्षा जास्त फायर ट्रक्स, ६० रुग्णवाहिका आणि ९०० हून अधिक बचाव कर्मचारी घटनास्थळी तैनात केले. किमान ६८ जखमींना रुग्णालयात दाखल केले गेले, त्यापैकी २५ जणांची प्रकृती गंभीर आहे. संकुलातील शेकडो नागरिकांना, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना, तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
पोलिसांच्या अहवालानुसार, इमारतीवर लावलेल्या संरक्षक जाळ्या, वॉटरप्रूफ कॅनव्हास आणि प्लास्टिक फॅब्रिक अग्निरोधक मानकांची पूर्तता करत नसल्याचे दिसून आले. लिफ्ट लॉबीच्या खिडक्यांवर पॉलीयुरेथेन फोम वापरल्याने आग वेगाने पसरली, असेही तपासात उघड झाले.
हाँगकाँगचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन ली यांनी विशेष तपास पथक तयार करून बेपत्ता लोकांच्या शोध मोहिमेला गती दिली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी शोक व्यक्त करत बचाव कार्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्याचे निर्देश दिले आहेत.
हाँगकाँगमधील ही भीषण आग आणि त्यातून निर्माण झालेली परिस्थिती शहरासाठी मोठा धक्का ठरली आहे, तर सरकार आणि बचाव कर्मचाऱ्यांचे प्रयत्न अद्याप सुरू आहेत.






