वृक्षतोडी प्रकरणी भाजपचे नाशिकमधील तीनही आमदार किंवा इतर पदाधिकारी भूमिका स्पष्ट करताना दिसत नाहीत. मात्र मतदार नागरिकही तितकेच महत्त्वाचे असल्याची भावना जनतेतून व्यक्त होते. त्यामुळे कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांचा अंतिम निर्णयच निर्णायक ठरेल, असे बोलले जाते.
भारतात चार ठिकाणी, तर महाराष्ट्रात केवळ नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. कुंभमेळ्याच्या निमित्ताने मिळणाऱ्या निधीतून नाशिकच्या विकासाला मोठा हातभार लागतो, हे निर्विवाद आहे. दर १२ वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्यात साधुग्रामसह अनेक प्रश्न उपस्थित होतात, यंदाही त्याला अपवाद नाही. साधुग्रामच्या जागेवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचा घेतलेला निर्णय अनाकलनीय ठरत असून, गेल्या काही दिवसांपासून वृक्षतोडीच्या मुद्द्यावर मोठा वादंग निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पर्यावरणप्रेमींनी एकत्रित बसून योग्य तो तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे. सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या दीड वर्षांवर आला असून तयारीची कामे जोरात सुरू झाली आहेत. प्रत्यक्षात ही कामे दोन वर्षांपूर्वीच सुरू व्हायला हवी होती. नाशिकनंतर होणाऱ्या उज्जैन कुंभमेळ्याची तयारीही मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची चर्चा आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यात साधू–महंतांसाठी साधुग्राममध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने ५४ एकरांवरील १८२५ वृक्ष तोडण्याची तयारी दर्शविली आहे. या निर्णयाला पर्यावरणप्रेमींकडून सुरुवातीपासूनच तीव्र विरोध होत आहे. या ठिकाणी पर्यावरणप्रेमींसह काही राजकीय पक्षांनी आंदोलन करत निषेध व्यक्त केला आहे. वाढत्या विरोधानंतर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी मनपा आयुक्त व अधिकाऱ्यांसह तपोवनाचा दौरा करत पर्यावरणप्रेमींच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी 'एक वृक्ष तोडल्यास दहा वृक्ष लावले जातील' असे त्यांनी स्पष्ट केलं. मात्र त्यावरही पर्यावरणप्रेमी समाधानी नव्हते. अलीकडेच मनपाकडे दाखल हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. सुनावणीदरम्यान पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आणि 'साधुग्राममधील एकही झाड तोडू देणार नाही' असा ठाम पवित्रा घेतला.
तसेच या निर्णयाविरुद्ध थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची भूमिकाही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे ही सुनावणी चांगलीच वादळी ठरली. महत्त्वाची सुनावणी असताना आयुक्त मनीषा खत्री बक्षीस समारंभाला गेल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस आणि सुरक्षा रक्षकांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
वृक्षतोड भूमाफिया आणि बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी होत असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले. साधू–महंतांसाठी झाडे तोडली जात आहेत, तर त्यांच्या तरी याबाबतची संमती आहे का, असा प्रश्नही उपस्थित झाला. आजवर झालेल्या कोणत्याही सिंहस्थ कुंभमेळ्यात झाडे तोडण्याची वेळ आली नव्हती, मग यावेळी अठराशे झाडे तोडण्याची गरज कशासाठी-असा सवाल करण्यात आला. 'सामान्य नागरिकाने झाड तोडले, तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो, मग येथे अठराशे झाडे तोडणे म्हणजे अठराशे खूनच,' अशी तीव्र टीका पर्यावरणप्रेमींनी केली. मागील कुंभमेळ्यात साधुग्राममधील अखाडा जागांवर लॉन्स तयार झाल्याचा अनुभव, ३०० एकर जागा हडप झाल्याची चर्चा, तसेच त्याचा तपास करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. पर्यावरणप्रेमींकडून पर्यावरण संतुलनाबरोबरच विकासाच्या गरजांकडेही लक्ष दिले जाणे आवश्यक आहे. त्यांचे आंदोलन योग्य असले तरी त्यातून मार्ग काढण्याची वेळ आली आहे. केवळ विरोधासाठी विरोध योग्य नाही. यापूर्वी नाशिकमध्ये रस्ते-इमारतींसाठी झालेले वृक्षारोपण, औद्योगिक वसाहतींतील पर्यावरणपूरक बाबींवरही त्यांनी पुढे येणे आवश्यक असल्याचे नागरिकांकडून मत व्यक्त होत आहे.
प्रशासन आणि नागरिकांच्या या वादात साधू-महंतांनीही उडी घेतली आहे. २०१५–१६ च्या कुंभमेळ्यात काही झाडांमुळे तंबू उभारण्यास अडचणी आल्या होत्या. तो अनुभव असताना पुन्हा दाट वृक्षारोपण का करण्यात आले, असा सवाल महंत रामकिशोर शास्त्री महाराज यांनी केला आहे. साधू–महंतांच्या तंबूंसाठी विस्तीर्ण मोकळी जागा आवश्यक असते. पूर्वी कधीही अशी अडचण निर्माण झाली नव्हती. जुन्या, मोठ्या झाडांची उपस्थिती असताना नव्याने वृक्षारोपण करण्याची गरज नेमकी काय होती, हे त्यांनी स्पष्ट विचारले आहे. साधुग्रामासाठी राखीव असलेल्या जागेत निर्वाणी, निर्मोही आणि दिगंबर या तीनही अखाड्यांचे तंबू लागतात. या तंबूंसाठी आवश्यक असलेल्या मोकळ्या जागेचा विचार न केल्यानेच आजची समस्या निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपल्या शहराच्या विकासासाठी पर्यावरणप्रेमी, नागरिक आणि प्रशासन यांनी एकत्र येऊन प्रयत्न केले तरच सिंहस्थ कुंभमेळा वादातीत होऊ शकेल, अशी अपेक्षा व्यक्त करूया. तोडगा काढताना आंदोलकांनी हे लक्षात घेण्याची गरज आहे की, तोडलेल्या नवीन झाडांच्या बदल्यात इतर ठिकाणी अधिक वृक्षारोपण करणे शक्य आहे, पण साधुग्राम इतर ठिकाणी तयार करता येणे शक्य आहे का? - धनंजय बोडके






