मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला २-० ने पराभव स्विकारावा लागल्यानंतर टीम इंडियाच्या कामगिरीवर मोठ्या प्रमाणात टीका सुरू झाली आहे. या कामगिरीनंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काही ठिकाणी जोर धरू लागली होती. परंतु आता या सर्व चर्चांना पूर्णविराम देणारी महत्वाची माहिती समोर आली आहे.
गंभीरच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत १८ पैकी १० कसोटी सामने गमावले आहेत. मागील वर्षी न्यूझीलंडविरुद्धची मालिका आणि आता घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा झालेला पराभव या टीकेचा केंद्रबिंदू ठरत आहेत. दुसरा कसोटी सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गंभीर यांना त्यांच्या पात्रतेबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी बीसीसीआयचाच अंतिम निर्णय असेल असे सांगितले. तसेच आपल्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकला हे ‘सगळे लगेच विसरले’, असेही त्यांनी म्हटले.
या सर्व घडामोडींमध्ये बीसीसीआय गंभीर यांच्यावर गदा आणणार की त्यांना कायम ठेवणार, याबाबत चर्चा रंगत होती. मात्र एका वृतानुसार, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या निराशाजनक पराभवानंतरही गौतम गंभीरच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहणार आहेत. गंभीर यांचा करार २०२७ पर्यंत आहे आणि विश्वचषक जवळ येत असताना बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या मनःस्तिथीत नाही.
गंभीर यांनीही सध्याच्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. हा संघ अनुभवाच्या बाबतीत कमी असून सतत शिकत राहण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “दोष सर्वांचा आहे, पण सुरुवात माझ्यापासून करा,” असे गंभीर म्हणाले. कसोटी क्रिकेटसाठी मोठी तारेसारखी प्रतिभा लागतेच असे नाही, तर मर्यादित कौशल्यांसह मजबूत मानसिकता असणारे खेळाडू महत्त्वाचे असतात, असेही त्यांनी सांगितले.






