नवी दिल्ली (वृत्तसंस्था): पाकिस्तानमध्ये सेनेचे वर्चस्व किती आहे, हे यापूर्वीच जगाने बघितलेले आहे. देशाची सत्तापालट करण्याच्या कुरापती यापूर्वी झालेल्या आहेत. त्यातच आता पाकिस्तानचे आर्मी चीफ जनरल असीम मुनीर यांच्याकडे पाकिस्तानचे कंट्रोल आलेले आहेत. तिन्ही सैन्य दलासह देशाच्या अण्वस्त्राची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर देण्यात आलेली आहे.
असीम मुनीर यांनी गुरुवारी देशातील पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स फोर्स पदाची सूत्रे स्वीकारली. पाकिस्तानी राज्यघटनेच्या २७ व्या दुरुस्तीद्वारे हे नवीन पद निर्माण करण्यात आले आहे. या बदलामुळे आता असीम मुनीर हे पुढील पाच वर्षांसाठी तिन्ही सैन्य दले (लष्कर, हवाई आणि नौदल) यांचे प्रमुख असतील.
पाकिस्ताच्या संसदेने १ नोव्हेंबर २०२५ रोजी घटनेत दुरुस्ती केली होती. त्यानुसार तिन्ही सेना दलांचे सर्व अधिकार असलेले जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटी हे पद संपुष्टात आणले गेले आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी १९७६ मध्ये हे पद तयार केले होते. पाकिस्तानच्या राजकारणावर, अर्थव्यवस्थेवर लष्कराचा प्रभाव अजूनही कायम आहे. त्यात पुन्हा २७ व्या घटनादुरुस्तीने हे संतुलन पूर्णपणे सैन्याच्या बाजूने झुकवले आहे. या बदलानुसार, असीम मुनीर हे तिन्ही सेना प्रमुखांसोबतच देशातील अण्वस्त्र प्रणालीचेही प्रभारी असतील. या बदलांमुळे मुनीर यांना देशाच्या राष्ट्रपतींच्या बरोबरीची कायदेशीर सुरक्षा देखील मिळाली आहे.