Wednesday, November 26, 2025

एमएमआरमध्ये २०० किमी जलवाहतूक मार्गांचे जाळे

एमएमआरमध्ये २०० किमी जलवाहतूक मार्गांचे जाळे

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून जलवाहतुकीचा पर्याय येत्या काळात उपलब्ध होणार आहे. त्यानुसार महाराष्ट्र सागरी मंडळाकडून मुंबई महानगर प्रदेशात २०० किमीहून अधिकचे नवीन जलवाहतुकीच्या मार्गाचे जाळे विणले जात आहे.

त्यात १० मार्गांचा समावेश असून डिसेंबरअखेरपर्यंत आराखडा पूर्ण होणार आहे. त्या दहा मार्गांमध्ये नवी मुंबई विमानतळ ते गेटवे ऑफ इंडिया या मार्गाचाही समावेश असून तेथून वॉटर टॅक्सी धावणार आहे. १८ किमीच्या या मार्गामुळे वॉटर टॅक्सीने नवी मुंबई विमानतळ ते गेटवे ऑफ इंडिया अंतर ४५ मिनिटात पार करता येणार आहे.

सध्या २१ जलवाहतूक मार्ग सेवेत असून, त्यातील १२ जलवाहतूक मार्ग एमएमआरमधील आहेत. जलवाहतूक मार्गांचा अधिक विस्तार करण्याचा निर्णय सागरी मंडळाने घेतला आहे.

त्यानुसार नवीन १० जलवाहतूक मार्ग सेवेत दाखल करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. नवीन मार्गांवर प्रवासी बोटी, रो-रो सेवा आणि वॉटर टॅक्सी धावणार आहेत. डिसेंबरअखेरपर्यंत आराखडा तयार होईल अशी माहिती सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी यांनी दिली.मुंबईतून नवी मुंबई, ठाणे, वसई, विरार, भाईंदर आणि अन्य ठिकाणी जलवाहतूक मार्गाने पोहचता यावे यासाठी नवीन १० जलवाहतूक मार्गांची आखणी केली जात आहे. त्यात वसई ते काल्हेर, कल्याण-मुंब्रा-काल्हेर-कोलशेत, काल्हेर ते नवी मुंबई विमानतळ, वाशी ते नवी मुंबई विमानतळ, गेटवे ते नवी मुंबई विमानतळ, वसई ते मार्वे अशा काही मार्गांचा समावेश आहे.

एकूण २०० किमीहून अधिकच्या जलवाहतूक मार्गांचा आराखडा तयार करण्यात येत आहे. या कामासाठी अंदाजे २५०० कोटींहून अधिक खर्च अपेक्षित आहे.

दक्षिण मुंबई ते नवी मुंबई विमानतळ पाऊण तासांत

सागरी मंडळाच्या १० मार्गांमध्ये नवी मुंबई विमानतळ ते गेटवे आॅफ इंडिया मार्गाचा समावेश असून या मार्गावरुन वाॅटर टॅक्सी धावणार आहे. हा जलवाहतूक मार्ग १८ किमीचा आहे. तो विकसित करण्यासाठी अंदाजे ३०० कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या जलवाहतूक मार्गांवरून किती आसनांची वाॅटर टॅक्सी धावेल, ती कशी असेल, त्यासाठी किती तिकीट दर असतील यासंबंधीची सर्व माहिती आराखडा तयार झाल्यानंतर निश्चित होईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment