मुंबई : मुंबईतील भायखळा परिसरात मोठा अपघात झाला आहे. जे जे हॉस्पिटलच्या जवळ असलेल्या एस ब्यु टी क्लस्टर १ इमारतीच्या बांधकाम साइटवर कन्स्ट्रक्शन क्रेनची केबल तुटल्यामुळे गंभीर दुर्घटना झाली आहे. या घटनेत इमारतीचे सेफ्टी इंजिनियर दानिश शेख गंभीर जखमी झाले.
एस ब्यु टी क्लस्टर १ इमारतीच्या बांधकामासाठी क्रेनचा वापर सुरू होता. क्रेनच्या सहाय्याने सिमेंटचा डबा वर उचलला जात होता, पण केबल तुटल्याने डबा खाली कोसळला. यामुळे अपघात झाला आणि इमारतीचा सेफ्टी इंजिनियर दानिश शेख गंभीर जखमी झाले. अपघातानंतर, दानिश शेख यांना तात्काळ उपचारासाठी जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्यांची स्थिती गंभीर आहे.
अपघाताची माहिती मिळताच, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू असून, पोलिस प्रशासन पंचनामा करत आहे. या घटनेबाबत सविस्तर चौकशी सुरू असून, जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.