गुवाहाटी : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला २-० ने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघावर आणि विशेषत: मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर टीकेची झोड उठली आहे. गुवाहाटीतील दुसऱ्या कसोटीत भारताला तब्बल ४०८ धावांनी हार पत्करावी लागली. गुवाहाटीत ५४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ केवळ १४० धावांत गारद झाला आणि हा भारताचा घरच्या मैदानावर धावांच्या फरकाने झालेल्या पराभवांपैकी सर्वात मोठा पराभव ठरला. या दारुण कामगिरीनंतर सोशल मीडियाद्वारे गंभीरवर तीव्र टीका सुरू झाली असून त्याने मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. काही ठिकाणी तर गंभीर लवकरच पद सोडणार असल्याचा अंदाजही व्यक्त करत आहेत.
सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना गौतम गंभीरने पराभवाची जबाबदारी स्वीकारली. “दोष सर्वांचा आहे, पण सुरुवात माझ्यापासून करा,” असे तो म्हणाला. तसेच आपल्या भवितव्याचा निर्णय बीसीसीआय घेईल, असं सांगत गंभीरने इंग्लंड दौर्यातील चांगल्या कामगिरीची आणि आपल्या मार्गदर्शनाखाली जिंकलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी व आशिया कपची आठवणही करून दिली. त्याच्या कार्यकाळात टीम इंडियाला अनेक अनपेक्षित धक्के बसले. ३६ वर्षांनंतर घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून कसोटी पराभव, १९ वर्षांनी बंगलुरूच्या चिन्नास्वामीवर हार, पहिल्यांदाच घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका गमावली, १२ वर्षांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत पराभव, वानखेडेवरील पराभव, तसेच पहिल्यांदाच घरच्या मैदानावर ३-० ने क्लीन स्वीप, अशा अनेक निराशाजनक निकालांची नोंद गंभीरच्या कार्यकाळात झाली. याशिवाय, टीम इंडिया पहिल्यांदाच WTC फायनलसाठी पात्र ठरू शकली नाही, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धही २५ वर्षांनी घरच्या मैदानावर मालिका गमवावी लागली.
या सलग पराभवांमुळे आणि संघाच्या सतत ढासळलेल्या कामगिरीमुळे भारतीय संघाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. गौतम गंभीरचे प्रशिक्षकपदही आता संकटात आल्याचे संकेत मिळत आहेत. बीसीसीआय लवकरच या प्रकरणी निर्णय घेऊ शकते, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. चाहत्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी, संघाची घसरलेली कामगिरी आणि गंभीरवर वाढत चाललेला दबाव पाहता आगामी काळात भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.






