Wednesday, November 26, 2025

पुणे जिल्ह्यात युतीत ‘फूट’, आघाडीत ‘बिघाडी’

पुणे जिल्ह्यात युतीत ‘फूट’, आघाडीत ‘बिघाडी’

पुणे जिह्यातील १४ नगर परिषदा आणि तीन नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिह्यातील राजकीय तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. महायुतीत फूट, तर आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे. उमेदवारी मागे घेतल्यानंतरही फारसे राजकीय चित्र बदलले नसून, जिह्यात महायुती आणि महाआघाडी यातील पक्षांनी एकमेकांना रामराम करत विरोधात उमेदवार उभे केले आहेत. नगराध्यक्षपदासाठी सर्वत्र चुरस दिसून येत असून, अपक्षांनी मोठे आव्हान नगरसेवकपदाच्या दावेदारांच्या समोर उभे केले आहे.

पुणे जिल्हात गेल्या काही दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकीय पटातील महत्त्वाचा केंद्रबिंदू राहिला आहे. राज्याच्या राजकारणात निर्णायक भूमिका बजावणारे नेते, व्यापक सामाजिक चळवळी, तसेच वाढत्या शहरीकरणामुळे तयार होणाऱ्या नव्या राजकीय गरजा यामुळे पुणे जिह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये प्रत्येक वेळी वेगवेगळ्या आणि रंजक समीकरणांची निर्मिती होताना दिसते. राजकीय पक्षांची हालचाल, स्थानिक पातळीवरील व्यक्ती-आधारित गट, समाजघटकांचे मतदानाचे कल आणि विकासाच्या मुद्द्यांवर आगामी निवडणुका अधिकच रंगतदार होणार आहेत. बारामती नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे दोन्ही राष्ट्रवादी आमने-सामने उतरले आहेत. भाजपला रासप पक्षाची साथ दिल्याने मजबूत झाली आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षानेही उमेदवार उभा केल्याने महायुतीतील मित्र पक्षासोबतच लढत द्यावी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडून ३२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात रासपचे चार उमेदवार आहेत. भाजपने अॅड. गोविंद देवकाते यांना उमेदवारी दिली आहे. बसपाच्या वतीने काळूराम चौधरी तर, शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख सुरेंद्र जेवरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदीप गारटकर यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन अजित पवार यांनाच आव्हान दिले आहे. हर्षवर्धन पाटील, भाजपचे युवा नेते प्रवीण माने यांच्याशी गारटकर यांनी हातमिळवणी केली असून, ‘कृष्णा-भीमा’ विकास आघाडीच्या वतीने ते रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने माजी उपनराध्यक्ष भरत शहा यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे गारटकर, शहा यांच्यात सरळ लढत होणार आहे. हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने, गारटकर एकत्र आल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. शहा यांच्या उमेदवारीला विरोध करून गारटकर यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे शहा यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय गारटकर यांनी घेतला. नगराध्यक्षपदासाठी १० जणांनी अर्ज भरले आहेत. तर, नगरसेवकपदासाठी ९० अर्ज आले आहेत. प्रभाग रचनेतील बदलामुळे निवडणुकीतील स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे. दौंड नगर परिषदेमध्ये नागरिक संरक्षण मंडळ आणि भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष आणि त्यांचे आघाडीतील मित्रपक्ष यांच्यातच तिरंगी लढत होत आहे. नागरिक संरक्षण मंडळ आणि भाजपचे आमदार राहुल कुल एकत्र आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे माजी आमदार रमेश थोरात आणि माजी नगराध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल उभे केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि मित्रपक्षांचे नेतृत्व अप्पासाहेब पवार यांच्याकडे आहे. दौंडचे आजी माजी आमदार राजकीय समीकरणाची जुळवाजुळवीसाठी प्रयत्न करत असल्याने निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. शिवसेनेत फूट पडली असली तरी चाकण नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. माजी आमदार दिवंगत सुरेश गोरे यांच्या पत्नी मनीषा गोरे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांना शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आमदार बाबाजी काळे यांनी पाठिंबा दिला आहे. शिरुरमध्ये महायुतीतील सर्व पक्ष स्वबळावर लढणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस महाआघाडीच्या माध्यमातून एकत्रित निवडणूक लढवत आहेत. तर उद्योगपती प्रकाश धारिवाल यांच्या शिरुर विकास आघाडीने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या आघाडीतील इच्छुक उमेदवारांना अन्य पक्षातून उमेदवारी मिळवावी लागली. त्याचबरोबर माजी नगरसेवक लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक यांनीही निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. भाजपकडून सुवर्णा लोळगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून माजी नगरसेविका रोहिणी बनकर यांनी फॉर्म भरला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडून माजी नगरसेविका पूजा जाधव या निवडणूक लढविणार आहेत. मंचर नगपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी होऊ शकली नसल्याने सर्व पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून मोनिका बाणखेले, शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने राजश्री गांजाळे, शिवसेना ठाकरे पक्षाकडून रजनीगंधा बाणखेले, काँग्रेस पक्षाकडून फरजीन मुलाणी यांना उमेदवारी दिली आहे. तर, भाजपने प्राची थोरात यांना उमेदवारी दिली. शिवसेना शिंदे पक्षाकडून जागृती महाजन यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.

सासवड नगर परिषदेमध्ये महायुती आणि महाआघाडी होऊ न शकल्याने सर्व पक्ष एकमेकांविरुद्ध निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यमान आमदार विजय शिवतारे आणि माजी आमदार संजय जगताप यांनी आपापले उमेदवार उभे केले आहेत. तसेच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार असल्याने चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या नगर परिषदेतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. भाजपकडून त्यांच्या मात़ोश्री आनंदी जगताप यांना उमेदवारी मिळाली आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख अभिजीत जगताप यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने पाठिंबा दिला आहे. जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने स्वतंत्र २० उमेदवारांसह नगराध्यक्षपदाचा उमेदवार केला. तर शिवसेना शिंदेंच्या पक्ष आणि भाजपने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, काही प्रभागांमध्ये उमेदवार निश्चित करताना एकमत न झाल्याने मैत्रीपूर्ण लढत जाहीर केली आहे. शिवसेना शिंदे पक्ष आणि भाजपने नगराध्यक्षपदासाठी सुजाता काजळे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, शेवटच्या क्षणी भाजपने तृप्ती परदेशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत युतीला धक्का दिला. शिवसेना ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आघाडी जाहीर केली. मात्र, त्यांना सर्व ठिकाणी उमेदवार देता आले नाही. तर काँग्रेसने राहीन कागदी यांना उमेदवारी दिली आहे. मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असून, त्यांच्यासमोर भाजप-शिवसेना युती, वंचित बहुजन आघाडीचे आव्हान असणार आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा आमदार सुनील शेळके यांच्याकडे असून, सत्ता कायम राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. मावळात महायुतीतील आणि महाआघाडीतील बंडखोरांना शांत करण्यास अपयश आले असून, तळेगाव दाभाडे नगर परिषद आणि वडगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. पुणे जिह्यातील राजगुरुनगर नगरसेवक पदासाठी १ कोटी ३ लाखांची बोली लागली तर, महिला नगरसेवकपदासाठी २२ लाखांची बोली लागली. हे निश्चितपणे लोकशाहीसाठी धोकादायक आहे.

Comments
Add Comment