मुंबई : जेव्हापासून आधार आयडी सुरु झाले तेव्हापासून करोडो लोकांचे युआयडीएआयकडे रजिस्ट्रेशन झाले आहे. अद्यापही अनेकजण आधार प्रणालीपासून दूर आहेत. नवीन जन्मलेली मुले, त्यांचेही आधार क्रमांक तयार करावे लागत आहेत. पुढे शिक्षणासाठी ते गरजेचे करण्यात आले आहे. अशावेळी युआयडीएआयकडे आकडा वाढतच चालला आहे. यामुळे युआयडीएआयने आधार क्रमांक निष्क्रीय करण्याची मोहीम सुरु केली आहे.
आधार डेटाबेसची अचूकता आणि सुरक्षितता राखण्यासाठी देशव्यापी महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत, २ कोटींहून अधिक मृत व्यक्तींचे आधार क्रमांक निष्क्रिय करण्यात आले आहेत. वास्तविक या १५ वर्षांच्या काळात करोडोंच्या संख्येने आधारधारक मृत झालेले आहेत; परंतू, त्याची माहिती युआयडीएआयला मिळालेली नसल्याने आजही त्यांचे आधार नंबर सक्रीय आहेत. यामुळे या आयडींचा वापर करून अनेक ठिकाणी फसवणूक केली जात आहे. बँक अकाऊंट उघडली जात आहेत, फ्रॉड केले जात आहेत. सरकारी योजनांचा लाभ घेतला जात आहे.
यामुळे युआयडीएआयने ही मोहिम सुरु केली आहे. मृत व्यक्तींची माहिती घेऊन त्यांचे आधार क्रमांक बंद केले जात आहेत. लोकांना आपल्या घरातील मृत व्यक्तींचे आधार क्रमांक कसे बंद करायचे याची माहिती नाही. यामुळे आधारलाही याची माहिती मिळत नाही. यामुळे आता युआयडीएआय अशा मृत व्यक्तींची माहिती भारताचे रजिस्ट्रार जनरल, विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या नागरी नोंदणी प्रणाली, सार्वजनिक वितरण प्रणाली आणि राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम अशा ठिकाणांकडून घेण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये पुढे बँका आणि इतर संस्थांचीही मदत घेतली जाणार आहे.
या संस्थांकडे तो व्यक्ती मृत असल्याची माहिती असली तरीही युआयडीएआयकडून वेगळी यंत्रणा राबवून त्याची पडताळणी केली जात आहे. यामुळे जिवंत असलेल्या व्यक्तीचे आधार रद्द होण्याची शक्यता टाळली जात आहे. याचबरोबर आधारच्या पोर्टलवरही एक सेवा सुरु करण्यात आली आहे. यामध्ये 'कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूची नोंदणी' पर्याय देण्यात आला आहे. कुटुंबातील सदस्य स्वतः प्रमाणित करून मृत व्यक्तीचा आधार क्रमांक, मृत्यू नोंदणी क्रमांक आणि इतर आवश्यक तपशील पोर्टलवर देऊ शकतात. मृत्यूचे अधिकृत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर या सुविधेचा वापर करून मृत व्यक्तीच्या आधार क्रमांकाची नोंदणी करावी, असे युआयडीएआयने आवाहन केले आहे.