मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके
हे शीर्षक वाचून खूप बरं वाटतं. कारण आनंद कुणाला नको आहे? परंतु असेही वाटेल की योग हा केवळ महिलांसाठी आनंदाची पर्वणी आहे का? इतरांसाठी नाही? असं निश्चितच नाही. योगसाधना सर्वांसाठी आनंद देणारीच आहे; परंतु एकूण स्वास्थ्याचा विचार करता, पुरुषांचं स्वास्थ्य आणि महिलांचं स्वास्थ्य यांचा वेगळा विचार करणं आवश्यक आहे. महिलांसाठी योगसाधना थोडी वेगळी आहे. इतकंच नव्हे तर अत्यावश्यक आहे.
निसर्गतः महिलांची शारीरिक रचना, मानसिक जडणघडण पुरुषांपेक्षा वेगळी आहे. स्थित्यंतरांचा कठीण काळ - एकूण जीवनकालात महिलांना अनेक स्थित्यंतरांना सामोरं जायला लागतं. पौगंडावस्थेत होणारी ऋतुप्राप्ती, त्यानंतर विवाह, गर्भारपण, प्रसूती, ऋतुनिवृत्ती या प्रत्येक टप्प्यावर स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होत असतात. यात मुख्य बदल होतात ते संप्रेरकांचे म्हणजेच हार्मोन्सचे. विविध अंत:स्त्रावी ग्रंथी विविध संप्रेरकं निर्माण करतात आणि ती रक्ताद्वारे शरीरातील विविध अवयवांपर्यंत पोहोचवतात. या ग्रंथींच्या आणि संप्रेरकांच्या कार्यावर आपल्या शरीरातील चयापचय, प्रजनन, वाढ, मानसिक स्वास्थ्यादी गोष्टी अवलंबून असतात. महिलांच्या आयुष्यातील स्थित्यंतरांच्या काळात अंत:स्त्रावी ग्रंथींच्या आणि पर्यायानं संप्रेरकांच्या कार्यप्रणालीतही आमूलाग्र बदल होतं असतात. संप्रेरकांच्या पातळीवर होणारे हे बदल सूक्ष्म आणि बरेचदा मानसिक स्तरावर होतात. त्यामुळे त्यांचे परिणाम दूरगामी असतात. म्हणूनच या स्थित्यंतराच्या काळात विशेषतः ऋतुप्राप्ती आणि ऋतुनिवृत्ती होत असताना मन हळवं, कातर, अस्थिर आणि अस्वस्थ होतं. काहींच्या बाबतीत ही मनाची दुर्बलता तात्पुरती असते पण काहींच्या बाबतीत मात्र यांचे परिणाम दूरगामी ठरतात.
बरं ही स्थित्यंतरं घडून येत असताना स्त्रियांना विश्रांती मिळतेच असं नाही. कारण घरातील अनेक जबाबदाऱ्या स्त्रियांना सांभाळायच्या असतात. नोकरी असेल तर तारेवरची कसरत बघायला नको. अगदी स्थित्यंतराच्या काळातही या जबाबदाऱ्यांपासून स्त्रियांची मुक्तता होत नाही. या काळात संप्रेरकांमुळे घडून येणारे मुख्य शारीरिक बदल म्हणजे वजन वाढणं, शरीराची जाडी वाढणं, तरीही थकवा जाणवणं. तर मानसिक बदल म्हणजे मनावर ताण जाणवणं, मनाची अस्थिरता, भीती, न्यूनगंड, मनाचा गोंधळ, निर्णय घेण्याची क्षमता कमी होणे, आत्मविश्वास डळमळणं. या मानसिक ताणतणावांचा परिणाम आपल्या शरीरातील विविध संस्थांच्या कार्यांवर देखील होतो.
SEMHPO अक्ष - सिद्धांत : यासंदर्भात योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे आणि डॉ. उल्का नातू यांनी SEMHPO अक्षाचा सिद्धांत सांगितला आहे. हा सिद्धांत थोडक्यात पुढीलप्रमाणे -
S - spiritual, E - Emotions, M - Mental health, H - Hypothalamus, P - Pituitary O - Organ असे या अक्षावरील एकमेकांशी जोडलेले बिंदू आहेत. जेव्हा विचारांना अध्यात्मिकतेची बैठक असते तेव्हा भावना नियंत्रित राहतात. भावनांचं नियंत्रण जमलं की मन स्थिर होतं आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं राहतं. यासाठी कारणीभूत असणाऱ्या शारीरिक स्तरावरच्या संस्था म्हणजे हायपोथॅलॅमस, पिच्युटरी ग्रंथी आणि शरीरातील इतर अवयव. हायपोथॅलॅमस हा मेंदूतील अगदी लहानसा भाग असून शरीरातील सर्व महत्त्वाची संप्रेरकं प्रामुख्यानं हायपोथॅलॅमसकडून पाठवली जातात. त्यामुळे सर्वात महत्त्वाची शरीरातील कार्यं हायपोथॅलॅमसवर अवलंबून असतात. हायपोथॅलॅमसनं पाठवलेली संप्रेरकं प्रथम पिच्युटरीग्रंथीकडे पाठवली जातात व तेथून ती आवश्यक त्या इतर अवयवांकडे पोहोचवली जातात. भावना जेव्हा अति उत्तेजित होतात, त्यावर नियंत्रण राहत नाही तेव्हा हायपोथॅलॅमसकडून अधिक प्रमाणात संप्रेरकांचा स्राव केला जातो. त्याचा परिणाम पर्यायानं अंत:स्त्रावी ग्रंथांच्या कार्यावर होतो. व त्यानंतर इतर अवयवांवर होतो. आपल्या लक्षात आलंच असेल की, आपल्यामध्ये दिसणाऱ्या कितीतरी शारीरिक रोगांचं कारण भावनिक आणि मानसिक असंतुलन आहे.
योग एक अपूर्व देणगी : अशा परिस्थितीत योग म्हणजे स्त्रियांसाठी दैवी देणगी आहे. त्यांच्यासाठी योग म्हणजे जणू वाळवंटातील मरुद्यान, शांतता देणारी जणू हिरवळ. आत्तापर्यंतच्या लेखांमध्ये आपण योगसाधनेचे सकारात्मक शारीरिक आणि मानसिक परिणाम पाहिले आहेतच. नित्यजीवनात तसेच स्थित्यंतराच्या काळात जर नियमित आणि उचित योगसाधना केली, तर आसन प्राणायामादी क्रियांनी शारीरिक स्वास्थ्य टिकवून ठेवता येतं. त्याचबरोबर मनही स्थिर, खंबीर ठेवता येतं. आत्मविश्वास डळमळत नाही. मुख्य म्हणजे वयोमानानुसार होणाऱ्या विविध बदलांना सामोरं जायचं सामर्थ्य प्राप्त होतं तसेच हे बदल समजण्याची आणि आनंदानं स्वीकारण्याचीही शक्ती मिळते. योगसाधनेतील धारणा, ध्यान इत्यादींमुळे स्वतःला समजण्याचं, आपल्यामधील सुप्त शक्ती ओळखण्याचं आणि त्या जागृत करण्याचं सामर्थ्य निर्माण होतं. नित्यनेमानं केलेली उचित योगसाधना उत्साह, जोम, चैतन्य, आनंद, सकारात्मकता आपल्यामध्ये निर्माण करतेच पण आपल्या सहवासातील आपली मुलं, भावंडं, आपले सहकारी, मैत्रिणी, घरातील ज्येष्ठ नागरिक यांच्यातही निर्माण करते.
स्त्री हा घरातील केंद्रबिंदू असतो. घरातील सर्व सदस्यांचे धागे घरातील कर्त्या, धर्त्या स्त्रीशी जोडलेले असतात. घरातील स्त्री शिकली, तर सगळं घर साक्षर होतं असं म्हणतात त्याप्रमाणेच घरातील स्त्री आनंदी, शरीरानं स्वस्थ आणि मनानं खंबीर परंतु समजूतदार असेल, तर सगळं घरच आनंदी होतं.
आपल्या परंपरेत इतकच नव्हे तर तत्त्वज्ञानातही स्त्रीला शक्ती म्हणजेच ऊर्जेचा स्त्रोत मानलं आहे. विश्वाची निर्मिती करायची तर ईश्वराला शक्तीची म्हणजेच ऊर्जेची आवश्यकता असते असं आपली संस्कृती मानते. जे वैश्विक स्तरावर तेच कौटुंबिक स्तरावरही तितकंच सत्य आहे. म्हणूनच स्त्रीनं स्वतःतील शक्तीला ओळखणं आवश्यक आहे आणि त्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे ती निरंतर योगसाधना. योग आपल्या आनंदाचं निदान आणि आनंदाची पर्वणी आहे.






