राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार, उत्तर रायगडात भाजपचा जोर, राजकीय जाणकारांचा अंदाज
अलिबाग : रायगड जिल्ह्यात दहा नगरपालिकांची रणधुमाळी सध्या रायगडात सुरू असून, या स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व मिळविण्यासाठी सरकारमधीलच मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचे चित्र आहे. हीच राजकीय परिस्थिती आगामी रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.
महाडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपच्या झालेल्या युतीमुळे शिवसेनेशी यापुढे त्यांचे सूत जुळणे अशक्य होणार आहे, असाच प्रकार खालापूर, कर्जत, श्रीवर्धनध्येही आहे. खोपोली नगरपालिकेचे पडसाद खालापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उमटू शकतात. कर्जतमध्येही शिवसेना, भाजप एकत्र असले, तरी राष्ट्रवादीने शेकाप, ठाकरे शिवसेनेला सोबत घेतले आहे. यामुळे आगामी काळातील निवडणुका या अशाच पद्धतीने होऊ शकतात. त्यात फारसा फरक पडणार नाही, असे दिसते. अलिबागमध्ये शेकाप, काँग्रेस एकत्र आलेली असून, राष्ट्रवादीने अद्याप कोणतीच भूमिका जाहीर केलेली नाही. शेकाप व ठाकरे शिवसेनेचे सूतही जुळलेले नाही. या उलट शिवसेना, भाजपने एकत्र येत युती टिकवली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही ही युती टिकू शकते. कारण अलिबागमध्ये शेकापला शह द्यायला आता माजी आमदार पंडित पाटील, अॅड. आस्वाद पाटील हे भाजपमध्ये असल्याने शक्य होणार आहे. याचाच फायदा युतीला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या उलट शेकापला अस्तित्वासाठी झगडावे लागणार आहे. कारण अलिबाग नगरपालिका निवडणुकीतील विजयाचा ग्रामीण भागातील राजकारणावर तसा फारसा प्रभाव पडणारा नाही. त्यामुळे काँग्रेसला सोबत घेतली असली, तरी ग्रामीण भागातही ठाकरे शिवसेनेशी मिळतेजुळते घ्यावे लागणार हे नक्की. उत्तर रायगडच्या पनवेल, पेण, उरण या मतदार संघात भाजपचे मोठ्या प्रमाणात वर्चस्व आहे.
तीनही भाजपचे आमदार जिल्हा परिषद निवडणुकीत निवडणुकीत भाजपला अनुकूल असे वातावरण पेण, उरण तालुक्यात नगरपालिका निवडणुकीमुळे होणार आहे. पनवेल महापालिकेवरही भाजपने सुरुवातीपासूनच वर्चस्व मिळविलेले आहे. याचाही फायदा भाजपला होऊ शकतो. त्या तुलनेने शिवसेना, राष्ट्रवादी या मित्रपक्षांची ताकद मर्यादित आहे. विरोधी महाविकास आघाडीतही आता एकवाक्यता राहिलेली नाही, त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याउलट कर्जत, खालापूर तालुक्यात शिवसेना, राष्ट्रवादीत सत्तेसाठी मोठा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमदार महेंद्र थोरवे यांनी, तर राष्ट्रवादीच्या विरोधात यांच्या विशेष करुन खासदार सुनील तटकरे यांच्यविरुद्ध आघाडी उघडली आहे. त्याचे पडसाद सध्या सुरू असलेल्या नगरपालिका निवडणुकीत दिसून येत आहेत. तीच स्थिती जिल्हा परिषद निवडणुकीतही उमटू शकते असा जाणकारांचा अंदाज आहे.
रोहा, मुरुड, श्रीवर्धन, महाड, माणगाव, तळा, म्हसळा या तालुक्यातही शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असाच संघर्ष पाहावयास मिळणार आहे. या तालुक्यांवर खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरतशेठ गोगावले यांचे मोठ्या प्रमाणात वर्चस्व आहे. त्यामुळे राजकीय अस्तित्वासाठी उभय नेत्यांना मोठा राजकीय संघर्ष करावा लागणार आहे. त्याची झलक आतापासूनच दिसून येत आहे. अर्थात महाड, श्रीवर्धन, मुरुड, रोहा या नगरपालिकांच्या निकालाचे पडसादही या तालुक्यांमध्ये उमटू शकतात.






