इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलांना देणार व्याकरणाची पुस्तके
मुंबई (खास प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांचे भाषेच्या लेखन कौशल्य व अस्खलित संभाषणाकरीता व्याकरणाची गरज आहे. त्यामुळे महापालिका शाळांमधील मुलांचे भाषेचे व्याकरण चांगले व्हावे याकरता आता इयत्ता ५वी व इयत्ता ८वी च्या सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांकरीता व्याकरणाची पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मुंबई महापालिकेच्यावतीने मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, उर्दू, तामिळ, तेलुगू आणि कन्नड अशा ०८ विविध माध्यमाच्या १०४८ प्राथमिक तसेच १४७ माध्यमिक शाळा अशा एकूण ११९५ शाळा चालविल्या जात आहेत. या शाळांमधून शिकत असणा-या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशिक्षित शिक्षक, अन्य मनुष्यबळाची तसेच शालेय इमारती, डेस्क-बेंच, फळे, शारीरिक शिक्षण साहित्य अशा भौतिक साधन सामग्रीची व्यवस्था महानगरपालिका करत असते. याशिवाय शैक्षणिक पुस्तके, अतिरिक्त अवांतर वाचनासाठी वाचनालयाची पुस्तके, नियत कालिके, ई-पुस्तके, डिजीटल कंटेंट इत्यादीही पुरविली जातात.
शासनाच्या स्तरावरस्तरावरून शैक्षणिक धोरण व शालेय अभ्यासक्रम ठरवले जात असल्याने त्याअनुषंगाने अध्ययन-अध्यापन साहित्य उपलब्धही करुन देण्यात येते. त्यानुसार विषयनिहाय अभ्यासक्रम आणि त्यास अनुसुरुन पाठ्यपुस्तिका उपलब्ध करुन दिल्या जातात. महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी चालू अर्थसंकल्पिय भाषणांत 'महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे भाषेच्या लेखन कौशल्य व अस्खलित संभाषणाकरीता व्याकरणाची गरज लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या शाळांमधील इयत्ता ५वी व इयत्ता ८वी च्या सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांकरीता व्याकरणाची पुस्तके उपलब्ध करून देण्याचे जाहिर केले. त्यानुसार आता , महानगरपालिका शाळांतील सर्व माध्यमाच्या इयत्ता ५ वी ते ८वी च्या विद्यार्थ्यांसाठी व्याकरण पुस्तिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यासाठी सुदेव एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली. मराठी, हिंदी, उर्दु, इंग्रजी या चार भाषेच्या व्याकरणाची पुस्तके इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवीच्रूा विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. या व्याकरणाच्या पुस्तकांच्या खरेदीसाठी ५ कोटी ६९ लाख रुपये खर्च केले जाणार आहे.