विक्रमगड : विक्रमगड तालुक्यातील जव्हार आदिवासी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ‘माण’ येथील आदिवासी सेवा मंडळाच्या असणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेत आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना सोमवार (दि. २४ ) रोजी घडली. विक्रमगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार संतोष वांगड हा १४ वर्षीय विद्यार्थी विक्रमगड तालुक्यातील ‘सवादे’ या गावातील असून त्याचे पहिली ते ७ वी पर्यंत शिक्षण याच आश्रमशाळेत झाले आहे. तो यावर्षी इयत्ता ८ वी मध्ये शिकत होता. विद्यार्थ्याच्या आईचे दुसरे लग्न झाले असून तुषारसह त्याचा मोठा भाऊ या दोन मुलांपासून दूर राहत आहे. त्यामुळे मधल्या काळात तुषारच्या वडिलांनीही आत्महत्या केली असल्याचे सांगितले जाते. दोन्ही पालकांपासून दूर झालेल्या या मुलाचे संगोपन त्यांची आजी करत होती. मात्र तिचेही एप्रिल महिन्यात निधन झाले. पालकांचे छत्र हरपल्यानंतर या सर्व घटनांमुळे तुषार मानसिक तणावाखाली आल्यामुळे आत्महत्या केल्याचे सांगितले जाते.
२४ नोव्हेंबर रोजी वसतिगृहातील सर्व विद्यार्थी नेहमीप्रमाणे सकाळी १०.३० ते ११.१५ वाजताच्या दरम्याने शाळेत गेले होते. मात्र तुषार हा विद्यार्थी शाळेत आलेला नव्हता. तुषारचे दोन वर्गमित्र हे शैक्षणिक साहित्य विसरल्याने ते साहित्य घेण्यासाठी पुन्हा वसतिगृहात गेले होते. त्यांनी खोलीचा दरवाजा उघडला असता त्यावेळी तुषार वांगड या विद्यार्थ्याने नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच शाळेच्या प्रशासनाने पोलिसांना याची माहिती दिली. विक्रमगड पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करत पुढील तपास प्रभारी पोलीस अधिकारी अजित गोळे हे करीत आहेत.
विद्यार्थी मुलांचे बिघडत चाललेले मानसिक स्वास्थ्य याबाबत सामाजिक संस्था व स्थानिक नागरिकांनी मुलांसाठी शैक्षणिक, पौष्टिक आहार, मानसिक आरोग्याच्या, सुरक्षिततेच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच मुलांना सपुदेशन केंद्र, सुरू करून तज्ज्ञांची नेमणूक व मागणी करण्यात येत आहे. या आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ५५७ आहे. प्रथमदर्शनी विद्यार्थ्याची आत्महत्या ही पालकांचे छत्र हरपल्यानंतर मानसिक तणावाखाली झाली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र नेमकी कशातून झाली आहे याचा सखोल तपास करण्यात येईल.– अपूर्वा बासूर, प्रकल्प अधिकारी, जव्हार






