Monday, November 24, 2025

तगडा नायक , उमदा माणूस

तगडा नायक , उमदा माणूस

पंजाबच्या मातीतून आकाराला आलेलं शिल्प म्हणजे धर्मेंद्र. बलदंड शरीर, तितकाच सोज्वळ चेहरा आणि दमदार अभिनय. अलीकडच्या काळात कारकिर्दीनंतरचा निवांतपणा अनुभवणारा हा तगडा नायक आणि उमदा माणूस अखेर अनंताच्या प्रवासाला गेला. चार दशकं सिनेचाहत्यांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या या ‘ही मॅन’च्या आठवणी...

१९६०च्या दशकात दोन तरुण उमदे, ताजेतवाने कलाकार एकदमरूपेरी पडद्यावर झळकले. चित्रपट होता ‘शादी’. साधा कौटुंबिक चित्रपट. पुढे ‘भारत’ बनून नायक निर्माता अन् दिग्दर्शक म्हणून लोकप्रिय ठरलेला मनोजकुमार अन् नंतर तगडा हिरो म्हणून गाजलेला धर्मेंद्र हे दोघे त्यावेळी अगदीच नवशिके होते. ‘पंजाब दा पुत्तर’ आणि ‘गरम धरम’ म्हणून फिल्मी मॅगझिन्सनी ज्याचा खूप उदोउदो केला तो धर्मेंद्र,आधी अगदीच साधा, लाजरा बुजरा अन् शांत होता.‘अंडर प्ले’ करण्याकडे त्याचा कल होता. १९६२ मध्ये आलेल्या ‘अनपढ’ या मोहन सैगल दिग्दर्शित चित्रपटात माला सिन्हाला जबरदस्त भूमिका मिळाली. ती अशिक्षित आणि तिचा नवरा धर्मेंद्र चक्क प्रोफेसर. सुटाबुटातला हा प्राध्यापक त्याने समरसून रंगवला. त्याची भूमिका चित्रपटाच्या आधीच संपते. पण तरी तो लक्षात राहून गेला. ‘आप की नजरों ने समझा’ या गाण्याच्या वेळी धर्मेंद्र-माला सिन्हा ही जोडी पडद्यावर झकास दिसली. ‘अनपढ’ दणकून चालला आणि त्याचा फायदा दोघांनाही मिळाला. ‘आप की परछाईयाँ’ आणि ‘देवर’ या चित्रपटांमधून धर्मेंद्र आणखी परिपक्व होत गेला. मदनमोहन (अनपढ, आप की परछाईयाँ) आणि रोशन (देवर) यांची गाणी तेव्हा खूप श्रवणीय ठरली.

धर्मेंद्र प्रेक्षकांच्या खरा लक्षात आला तो ‘फूल और पत्थर’ या भव्य रंगीत चित्रपटामुळे. इथे मीनाकुमारी त्याची नायिका होती. ती विधवा आणि असहाय्य तर हा गुन्हेगारी जगतात बुडालेला शराबी. तिची शांत सोज्वळ प्रतिमा तर हा आक्रमक दणकट व्यक्तिमत्वाचा पत्थरदिल इन्सान, पण शांती (मीनाकुमारी) आपल्या व्यक्तिमत्वाने शाकाचा (धर्मेंद्र) कायापालट घडवते. दोन्ही व्यक्तिमत्त्वांमधला विरोधाभास मोठा मनोज्ञ ठरला. पांढऱ्याशुभ्र साडीमध्ये मीनाकुमारी अन् पिळदार शरीराचं दर्शन घडवणारा ‘ही मॅन’ धर्मेंद्र ही जोडी प्रेक्षकांना रोमांचित करून गेली. रवीचे संगीत कर्णमधूर होते. रंगांची उधळण, श्रीमंत निर्मिती हे ‘फूल और पत्थर’चे मोठे आकर्षण ठरले. मीनाकुमारीला आगीतून वाचवताना धर्मेंद्रचा चेहरासुद्धा खूप होरपळून निघाला. ‘अगली फिल्म में आग का सीन जरूर डालना’ ही उपरोधित प्रतिक्रिया देत मीनाकुमारी आणि धर्मेंद्र यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. दोघांनी ‘पूर्णिमा’, ‘चंदन का पलना’ अशा चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. रामानंद सागर यांच्या ‘आँखे’ या चित्रपटात धर्मेंद्र गुप्तहेर म्हणून चमकला. माला सिन्हाबरोबर त्याची जोडी जमली. त्याचा पडद्यावरचा वावर आता अधिक जोशिला अन् आत्मविश्वासपूर्ण वाटू लागला. इथे पुन्हा एकदा रवीचे संगीत वेगळे आणि वैशिष्टयपूर्ण ठरले.

बी. आर. फिल्म्सच्या यश चोप्रा दिग्दर्शित ‘आदमी और इन्सान’मध्ये धर्मेंद्रचा डॅशिंग रोल होता. सायरा बानू अन् मुमताज अशा दोन नायिका इथे धरमबरोबर दिसल्या. ‘चैताली’ हा बिमल रॉय यांचा अपुरा चित्रपट हृषिकेश मुखर्जींनी पुरा केला. त्यातले धर्मेंद्रचे योगदान मोठे होते. सायरा बानू इथे निराळ्या ‘ऑफ बिट रोल’मध्ये चमकली. हृषिकेश मुखर्जींसमवेत धर्मेंद्रचे सूर छान जुळले. त्यांच्या ‘सत्यकाम’, ‘चुपके चुपके’, ‘गुड्डी’ अशा अनेक चित्रपटांमधून धर्मेंद्र विभिन्न भूमिकांमध्ये दिसला. ‘सत्यकाम’मध्ये धर्मेंद्र ध्येयवेडा, नि:स्पृह अभियंता म्हणून वावरला. शर्मिला टागोर, संजीवकुमार असे जबरदस्त कलावंत समोर असताना धर्मेंद्र ही भूमिका खरोखर जगला. ‘सत्यकाम’ला पुरेसे यश न मिळाल्यामुळे धर्मेंद्र आणि हृषिदा खूप निराश झाले असणार. ‘गुड्डी’मध्ये तर धर्मेंद्र सिनेनट धर्मेंद्र म्हणूनच दिसला आणि त्याने बहार उडवून दिली. जया भादुरीनंतर ‘गुड्डी’मध्ये तोच लक्षात राहून गेला.

‘चुपके चुपके’मध्ये त्याने अचूक टायमिंग साधत शर्मिला अन् अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा प्रभाव पाडत विनोदी अभिनयातले स्वत:चे कर्तृत्व सिद्ध केले. नूतन (सूरत और सीरत), आशा पारेख (समाधी), मुमताज (लोफर, झील के उस पार) अशा अनेक नायिकांबरोबर त्याने काम केले तरी त्याची सरस जोडी जमली ती हेमा मालिनीबरोबर. ‘मैं कहीं कवि न बन जाऊँ’(प्यार ही प्यार), ‘ये शमा तो जली’ (आये दिन बहार के), ‘आज मौसम है बेईमान’(लोफर) या महंमद रफीच्या सुरेल गीतांना त्याने रूपेरी पडद्यावर यथोचित न्याय दिलाय यात शंकाच नाही.

‘तुम हँसी मैं जवा’, ‘शरारत’, ‘नया जमाना’, ‘आझाद’, ‘जुगनू’, ‘आसपास’, ‘राजा जानी’, ‘चरस’ अशा अनेक चित्रपटांमध्ये धर्मेंद्र-हेमा मालिनी जोडीने चाहत्यांना खूश करून टाकले. ‘मुन्ने की अम्मा रे’(तुम हँसी मैं जवाँ) या गाण्यात धर्मेंद्रने लोटपोट हसवले. ‘राजा जानी’ आणि ‘जूगनू’ मधला हेमा-धर्मेंद्रचा रोमान्स खूप रोमांचक ठरला. राज कपूर-नरगिस जोडीनंतर प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ‘हिट पेअर’ म्हणून धर्मेंद्र -हेमा मालिनी यांचा प्रचंड बोलबाला झाला. हेमा मालिनी ‘आझाद’मध्ये त्याचे ‘लंबा कद चौडा सीना’ असे वर्णन करते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे भावदर्शन मोठे विलोभनीय होते. रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ या चित्रपटात या जोडीने धुमाकूळ घातला. ‘कोई हसीना जब’ या गाण्यातला रूसवा-फुगवा लाजवाब ठरला. पाण्याच्या टाकीवर चढून धरमने दारूच्या नशेत म्हटलेले धमाल संवाद ‘शोले’चे मोठे आकर्षण ठरले. ‘सीता और गीता’ मधला धर्मेंद्रचा डोंबारी अफलातून होता. ‘अनाडी है कोई खिलाडी है कोई’ या मन्ना डेच्या गाण्यात धर्मेंद्रने बहार उडवून दिली. राजू (आझाद) हे रफीचे गीत घोड्यावर बसून गाताना धरमने छोट्या मुलांना आकर्षित करून घेतले. ‘धरम-वीर’मध्ये त्याने प्राणला तोडीस तोड झुंज दिली. ‘कहानी किस्मत की’ या अर्जुन हिंगोरानी यांच्या चित्रपटात ‘रफ्ता रफ्ता देखो’ या किशोरने गायलेल्या गाण्यात रेखासमवेत ‘अग ये, जवळ ये लाजू नको’ म्हणत मराठमोळ्या अवतारात धर्मेंद्रने प्रचंड धमाल उडवून दिली. उत्स्फूर्त, अनावर भावनांचा हा अनोखा हंगामा, प्रेक्षकांमध्ये मोठा जल्लोष निर्माण करत लोकप्रियतेची बुलंदी गाठून गेला. दिल्लगी (हेमा मालिनी), दोस्त (हेमा, शत्रुघ्न), मेरा गाव मेरा देश (आशा पारेख, विनोद खन्ना), रखवाला, बाजी (रेखा) हे धर्मेंद्रचे आणखी काही गाजलेले चित्रपट. धर्मेंद्रच्या अभिनयात उपरोध, आर्त उदासी, प्रणयातूर प्रेमी या साऱ्या भावभावना दिसत. ‘माँऽऽ’ ही त्याची ओथंबलेली हाक आणि ‘एक एक को चुन चुनके मारूँगा’ हा उद्रेक प्रेक्षकांच्या अंतर्मनाला स्पर्श करून जाई.

हेमा मालिनीबरोबर त्याचे दुसरे लग्न देशभर खळबळ माजवून गेले. पण त्या दोघांच्या चाहत्यांना विलक्षण आंनद झाला एवढे नक्की. धर्मेंद्रने नव्या पिढीला दणकट बांधेसूद शरीरयष्टीचे महत्त्व पटवून दिले. आज आमिर खान, सलमान खान, हृतिक रोशन त्याचे अनुकरण करताहेत. ‘प्रतिज्ञा’ हा धर्मेंद्रचा सर्वांगसुंदर चित्रपट. ‘मैं जट यमला पगला दिवाना’ या गाण्यातला त्याचा हंगामा विसरणे शक्य नाही. सनी आणि बॉबी ही मुले आज चित्रपट गाजवत आहेत. आता तो आपल्यामध्ये नसला तरी नानाविध भूमिकांमधून ठेवलेला आठवणींचा नजराणा चित्रपटरसिक कधीच विसरणार नाहीत. या व्यक्तिरेखांमध्ये धर्मेंद्रने उडवून दिलेली धमाल आणि दाखवून दिलेले अनेक प्रकारचे भाव चाहते हयातभर लक्षात ठेवतील.

- सदानंद गोखले

Comments
Add Comment