मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे यांच्या मृत्यू प्रकरणात खुलासे होऊ लागले आहेत. गौरीचे वडील अशोक पालवे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनंत गर्जे व त्यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप करत तपास प्रक्रियेतील अनेक त्रुटींचा पाढा वाचला.
अशोक पालवे यांनी सांगितले की, गौरीचा मृत्यू आत्महत्येमुळे नसून मारहाणीमुळे झाल्याचा त्यांना ठाम संशय आहे. गळ्यावर गळफासाचे व्रण नसताना तिच्या छातीवर व डोक्यावर जखमांचे ठसे स्पष्ट दिसत होते, असा दावा त्यांनी केला. या खुणा असूनही तपास अधिकारी यादव यांनी काहीही नसल्याचे सांगितल्याचा त्यांनी आरोप केला. पोस्टमॉर्टेम ‘इन-कॅमेरा’ करण्यात आला, कुटुंबियांना आत प्रवेश दिला नाही, सही घेण्यात आली नाही आणि पंचनामा कुटुंबीय पोहोचण्यापूर्वीच झाला, यावर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले.
घटनेच्या वेळी अनंत गर्जेच्या वर्तनाबाबतही पालवे यांनी संशय व्यक्त केला. घटनेनंतर तो अचानक गायब झाल्याने शंका अधिकच वाढत असल्याचे ते म्हणाले. “जर काही गुन्हा केला नसेल, तर पती घटनास्थळ व कुटुंबियांपासून दूर का राहिला?” असा सवाल पालवे यांनी उपस्थित केला.
अशोक पालवे यांनी पत्रकार परिषदेत आणखी एक महत्त्वपूर्ण दावा केला. घर बदलताना गौरीला काही महत्त्वाचे कागदपत्रे सांभाळायला दिली होती. त्यात तिला २०२१ मध्ये अंबाजोगाईतील एका मुलीच्या सोनोग्राफी व गर्भपाताचा रिपोर्ट सापडला. त्या रिपोर्टवर “पती – अनंत गर्जे” असे नाव असल्याचा दावा पालवे यांनी केला. हा रिपोर्ट त्यांनी पोलिसांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
पंकजा मुंडे यांनी दुसऱ्या दिवशी फोन करून निष्पक्ष तपासाचे आश्वासन दिल्याचे अशोक पालवे यांनी सांगितले. “ताईंच्या विश्वासाने आम्ही मुलगी दिली; आज आम्हाला न्याय हवा आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
गौरी आत्महत्या करण्यासारखी व्यक्ती नव्हती, ती मानसिकदृष्ट्या सक्षम होती आणि तिच्या सहकाऱ्यांनीही तसेच सांगितल्याचा उल्लेख करत पालवे यांनी हा मृत्यू आत्महत्येचा नसून संशयास्पद असल्याचे पुन्हा अधोरेखित केले. त्यांनी तात्काळ, वेगवान आणि निष्पक्ष तपासाची मागणी केली आहे.






