मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले असून, त्यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले. अंत्यसंस्कारावेळी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार तसेच कुटुंबीयांनी त्यांना अंतिम निरोप दिला. धर्मेंद्र यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत ३०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या योगदानाचा गौरव म्हणून भारत सरकारकडून २०१२ साली त्यांना पद्मभूषण या नागरी सन्मानाने गौरवण्यात आले. परंतु एवढ्या मोठ्या सन्मानानंतरही त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले नाहीत. यामागचे कारण आता स्पष्ट झाले आहे.
शासकीय सन्मानासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण न झाल्याचे समजते. सूत्रांनुसार, धर्मेंद्र यांच्या निधनाची माहिती प्रशासनाला उशिराने कळवण्यात आली. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबीयांकडून अगोदर प्रस्ताव दिला जाणे आवश्यक असते आणि त्यानंतर सरकारी मंजुरी घेतली जाते. मात्र या प्रक्रियेसाठी लागणारा कालावधी उपलब्ध नसल्यामुळे आणि कुटुंबीयांनीही त्यात स्वारस्य न दाखवल्यामुळे सरकारी सन्मानात अंत्यसंस्कार शक्य झाले नाहीत.
धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी माध्यमांनाही उशिराने समजली. मृतदेह स्मशानभूमीकडे जात असतानाच अनेकांना त्यांच्या निधनाची माहिती मिळाली. हेमा मालिनी स्मशानभूमीत थेट पोहोचल्या, तर अमिताभ बच्चन, आमीर खान यांसारखे कलाकारही शेवटचा निरोप देण्यासाठी तेथे दाखल झाले. शाहरुख खान मात्र अंत्यसंस्कारानंतर पोहोचला.
१९९७ मध्ये फिल्मफेअर लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार मिळवलेल्या धर्मेंद्र यांना २०१२ मध्ये पद्मभूषण बहाल करण्यात आला होता. मात्र आवश्यक शासकीय प्रक्रिया वेळेअभावी पूर्ण न झाल्याने त्यांच्या अंत्यसंस्कारांना राजकीय इतमाम प्राप्त होऊ शकला नाही.






