अमरावती : अमरावतीच्या धारणी नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील चोथमल आणि धारणीमधील भाजपच्या सर्व उमेदवारांच्या प्रचार सभेत माजी खासदार नवनीत राणा यांनी मी पुन्हा येईन, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच पुन्हा खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली. नवनीत राणा यांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यावर सूचक वक्तव्य केले आहे.
आमची माजी खासदार आता तुमच्या आशीर्वादाने माजी खासदार राहणार नाही, असे म्हणत नवनीत राणांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिला. धारणी येथील नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत देवेंद्र फडणवीसांनी नवनीत राणांच्या खासदारपदाविषयी सूचक वक्तव्य केल्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नवनीत राणा यांना राज्यसभेवर पाठवणार किंवा एखादी मोठी जबाबदारी देणार अशी चर्चा आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सूचक वक्तव्यावर नवनीत राणा काय म्हणाल्या ?
'देवा भाऊ राज्यातील सगळ्या महिलांच्या डोक्यावर हात ठेवून महिलांना विश्वास दिला आहे. सर्व महिलांच्या पाठीशी ते उभे आहेत.भावासमोर बहिणींनी बोलणं काही नवल नाही. यापूर्वी देवा भाऊंनी शायरी केली होती. "मेरा पाणी उतरता देख किनारे पे घर मत बांध लेना,मै समंदर हू मै फिर लोट के आऊंगा..."मी त्याच पद्धतीने देवा भाऊ समोर माझ मत व्यक्त केलं आहे. मै फिर के आऊंगी.. मी पुन्हा येईल असं म्हटलं यात काही चुकीचं नाही...आणि माझ्या भावाने सांगितलं की माजी खासदार नवनीत राणा या माजी राहणार नाही, माझ्या माहेरी येऊन शब्द दिलेला आहे आणि देवा भाऊ हे शब्द पाळणारे आहेत.'