Tuesday, November 25, 2025

पुण्यात वाढतेय बिबट्याची दहशत! औंधनंतर आता धानोरीमध्ये बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुण्यात वाढतेय बिबट्याची दहशत! औंधनंतर आता धानोरीमध्ये बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुणे: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात बिबट्यांची दहशत वाढली आहे. ग्रामीण भागात दिसणाऱ्या बिबट्यांची एन्ट्री आता शहरात झाली आहे. पुण्यातील औंध शहरात बिबट्यांच्या वाढत्या संख्येनंतर आता धानोरी परिसरातील मुंजाबावस्ती येथेही बिबट्याचे दर्शन घडले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक नागरिकांकडून माहिती मिळताच, वनविभाग आणि वन्यजीव बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम सुरू केली आहे.

धानोरीच्या निवासी भागात पहाटेच्या वेळी बिबट्या फिरत असल्याचे फुटेज सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले आहे. हे फुटेज समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहे. हा बिबट्या पहाटे एकदा दिसल्यानंतर परत कुठेच दिसला नाही. ज्यामुळे तो जवळच्या संरक्षण वनक्षेत्रांमधून आला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

वनविभागाने मुंजाबावस्ती आणि नजीकच्या लोहगाव तसेच पुणे विमानतळ परिसराच्या हद्दीतही बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पिंजरे आणि कॅमेरा ट्रॅप्स लावले आहेत. वनविभागाने बिबट्याचा शोध पूर्ण होईपर्यंत मुंजाबावस्ती आणि आसपासच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणात नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता, कोणतीही नवीन माहिती किंवा बिबट्याचं प्रत्यक्ष दर्शन झाल्यास तातडीने वनविभागाला संपर्क साधण्याचे निर्देश दिले आहेत.

पुणे शहरातील औंध भागातही नुकतेच बिबट्याचे दर्शन झाले होते. एका सोसायटीच्या आसपास बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. शहराच्या मध्यवर्ती भागात स्थानिकांना बिबट्या आढळून आल्याने पुणेकरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >