Tuesday, November 25, 2025

लाडकी बहीण योजना कायम राहणार; नगरपालिकांवर भगवा फडकवण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन

लाडकी बहीण योजना कायम राहणार; नगरपालिकांवर भगवा फडकवण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन

अकोला : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील सभेत मतदारांना उद्देशून मोठी घोषणा केली. अयोध्या राममंदिरातील कळस व धर्मध्वज अनावरणाचा उल्लेख करत त्यांनी नगरपालिकांवरही भगवा झेंडा फडकवण्याचे आवाहन केले. “अयोध्येच्या मंदिरावर भगवा फडकला, तसाच भगवा हिवरखेड, तेल्हारा आणि अकोट नगरपालिकांवरही फडकला पाहिजे,” असे फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले की, भाजपने प्रत्येक शहराच्या विकासासाठी स्पष्ट आराखडा तयार केला आहे. राज्यातील अनेक गावांवर लक्ष दिले गेले, मात्र शहरांच्या मूलभूत सुविधांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष झाल्याने शहरी भाग बकाल झाले आहेत. पारदर्शक आणि जबाबदार कामकाजासाठी भाजपचे उमेदवार पुढे केले असल्याचे त्यांनी नमूद केले.

“जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही”

फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेवरही भाष्य करत महत्त्वाचा संदेश दिला. “निवडणुकांच्या काळात विरोधकांनी पसरवले की सरकार ही योजना थांबवेल. पण माझ्या बहिणींना मी स्पष्ट सांगतो, तुमचा ‘देवाभाऊ’ मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना कधीच बंद होऊ देणार नाही,” असे त्यांनी आश्वासन दिले.

ते पुढे म्हणाले की, गेल्या वर्षभरात सरकारने कोणतीही योजना बंद केली नाही; उलट लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज, पिकविमा, आणि कृषीविषयक अनेक निर्णय सातत्याने राबवले जात आहेत. “आम्ही फक्त आश्वासनाची राजकारण करणारे नसून लोकांच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडवण्यावर आमचा भर आहे,” असे ते म्हणाले.

अयोध्येतील राममंदिराच्या कळस व धर्मध्वज अनावरणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, मंदिराचे काम पूर्णत्वास येते तेव्हा कळस बांधला जातो. “आज अयोध्या पूर्ण झाली, आता तुमच्या परिसरात विकासाचा कळस चढवण्याची जबाबदारी तुमच्या हातात आहे,” असे ते म्हणाले.

सभेनंतर मुख्यमंत्री बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे जाऊन ११ नगरपरिषदांच्या भाजप उमेदवारांच्या प्रचाराला संबोधित केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >