Tuesday, November 25, 2025

राममंदिरावर फडकवण्यात येणाऱ्या ध्वजाची रचना, महत्त्व आणि इतर तपशील, जाणून घ्या सविस्तर

राममंदिरावर फडकवण्यात येणाऱ्या ध्वजाची रचना, महत्त्व आणि इतर तपशील, जाणून घ्या सविस्तर

अयोध्या : हिंदूंचे धार्मिक स्थळ असलेल्या राम मंदिरावर आज ध्वजारोहण समारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी १२:१० ते १२:३० या शुभ मुहूर्तावर राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण करण्यात येणार आहे. हा ध्वज वर्षातून दोनदा वासंतिक नवरात्र आणि शारदीय नवरात्र दरम्यान बदलला जाईल, अशी माहिती श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे विश्वस्त आणि ध्वजारोहण समारंभाचे प्रमुख यजमान डॉ. अनिल मिश्रा यांनी दिली आहे.

धार्मिक ध्वजाचे महत्त्व

राम मंदिरावर फडकवण्यात येणाऱ्या ध्वजाच्या खांबाची उंची ३० फूट आहे. जो मंदिराच्या १६१ फूट उंच शिखरावर बसवला गेला आहे. या ध्वजामुळे मंदिराचे शिखर आणि ध्वज अशी एकूण १९१ फूट उंची होणार आहे. हा ध्वज ११ फूट लांब आणि २२ फूट रुंद आहे. ज्याचा रंग भगवा म्हणजेच हिंदूचे प्रतीक आहे. या ध्वजासाठी रेशमी कापड वापरले असून त्यावर पॅराशूट कापडाचा थर आहे. या ध्वजावर मध्यभागी सूर्य आणि त्यामध्ये ओमचे चिन्ह आहे. तर सूर्याच्या बाजूला कोविदार वृक्ष आहे. हा ध्वज सहा कारागिरांनी तयार केला आहे.

ध्वजावर असणाऱ्या चिन्हांचे अर्थ

भगवा रंग : प्रकाश, त्याग आणि तपाचे प्रतिक सूर्य चिन्ह : प्रभू रामचंद्राच्या सूर्यवंशाचे प्रतिक कोविदार वृक्ष : अयोध्याचे राजवंशीय चिन्ह सूर्याच्या मध्यभागी असणारे ओम चिन्ह : परमात्म्याचे प्रथम अक्षर ध्वजारोहण समारंभात सर्वप्रथम वैदिक स्तोत्रांसह ध्वजाची पूजा करणे आणि दैवी औषधी वनस्पतींनी स्नान घालणे समाविष्ट आहे. यानंतर ध्वज मुख्य यजमानांनी नियुक्त केलेल्या शुभ मुहूर्तावर फडकविण्यासाठी सुपूर्द केला जाईल. राम मंदिरावर फडकवण्यात येणारा हा ध्वज विजय, अध्यात्म आणि सहिष्णुतेचा संदेश देतो.

Comments
Add Comment