मुंबई : मुंबईच्या चेंबूर परिसरात एका मंदिरात घडलेल्या विचित्र घटनेने मोठा धार्मिक वाद निर्माण केला आहे. वाशी नाका भागातील काली मातेच्या मूर्तीला ‘मदर मेरी’ प्रमाणे पोशाख घालण्यात आल्यानंतर हिंदू संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मूर्तीवरील पोशाख बदलाचा हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी मंदिरातील पुजारीला तातडीने ताब्यात घेतले असून त्याच्यावर भारतीय दंडसंहिता कलम २९५ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरातील पुजारी रमेश याने स्वतःच काली मातेच्या मूर्तीला मदर मेरीसारखा पोशाख परिधान केला होता. मूर्तीचे संपूर्ण रूपच वेगळ्या धार्मिक प्रतिकासारखे दिसत असल्याने स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली. चौकशीत पुजाऱ्याने दावा केला की, “देवीने स्वप्नात येऊन मदर मेरीचा पोशाख घालण्यास सांगितले.” मात्र हिंदू संघटनांनी हा दावा तात्काळ फेटाळून लावत, हा जाणीवपूर्वक केला गेलेला अवमान असल्याचे सांगितले.
वाद वाढताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुजारी रमेशला ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासात या कृतीमागे काही मिशनरी लोकांनी प्रलोभन अथवा आर्थिक मदत दिल्याचा आरोपही समोर आला असून, त्या दिशेनेही चौकशी सुरू आहे.
घटनेनंतर बजरंग दलासह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी या कृत्याचा तीव्र निषेध केला. संघटनांनी मंदिर परिसरात आंदोलन करून, प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. या संपूर्ण प्रकरणामुळे चेंबूर परिसरात धार्मिक वातावरण तापले असून पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. पुढील चौकशी सुरू आहे.






