मुंबई : बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा ड्रग्ज सिंडिकेटचे सावट गडद होताना दिसत आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाने (ANC) अलिकडील काही दिवसांत अनेक कलाकारांना चौकशीसाठी नोटिसा पाठवल्यानंतर या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेता आणि दिग्दर्शक शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूर आज चौकशीसाठी घाटकोपर येथील एएनसी कार्यालयात पोहोचला.
एएनसीच्या घाटकोपर युनिटने सिद्धांत कपूरला अधिकृतरीत्या समन्स बजावले होते. याच प्रकरणात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ऑरीलाही बुधवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुबईमधून आणण्यात आलेल्या मुख्य ड्रग सप्लायर मोहम्मद सलीम सोहेल शेख उर्फ ‘लॅविश’ यांच्या चौकशीत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे समोर आल्यामुळे पोलिसांनी संबंधितांना चौकशीसाठी बोलावण्यास सुरुवात केली आहे. सिद्धांत कपूर हा पहिला अभिनेता आहे, ज्याचा या प्रकरणी अधिकृतपणे जबाब नोंदवला जात आहे.
सुत्रांनुसार, महाराष्ट्रातील सांगली येथील एका औद्योगिक युनिटमध्ये जवळपास २५२ कोटी रुपये किमतीचे मेफेड्रोन (MD) जप्त झाल्यानंतर पोलीस तपासाचा फोकस या रॅकेटकडे वळला आहे. चौकशीत मुख्य आरोपी शेखने भारतात आणि विदेशात आयोजित करण्यात आलेल्या मोठ्या ड्रग पार्ट्यांबद्दल माहिती दिली असून, त्यात बॉलिवूड कलाकार, मॉडेल, रॅपर्स, निर्माते आणि अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमशी संबंधीत लोकही उपस्थित असायचे, असा दावा केला आहे.
सिद्धांत कपूरला चौकशीसाठी का बोलावले ?
पोलीस तपासात मिळालेल्या काही दस्तऐवजांमध्ये सिद्धांत कपूरचे नाव त्या हाय-प्रोफाइल पार्ट्यांच्या उपस्थितांच्या यादीत असल्याचे आढळून आल्याची माहिती आहे. एएनसीने मात्र स्पष्ट केले की, केवळ नाव आढळल्यावर चौकशीसाठी बोलावणे म्हणजे व्यक्ती दोषी आहे, असे नाही. सध्या सिद्धांतला फक्त स्पष्टीकरण आणि माहिती घेण्यासाठी समन्स देण्यात आले आहे.






