आयुर्वेद दीपिका

वैशाली गायकवाड


कर्तृत्ववान ती राज्ञी : वैद्य सुचित्रा कुलकर्णी 


“आरोग्याचा दीप लावुनी,
ज्ञानामृत ते वाटती
सेवा-समर्पणातून,
जीवनाला नवी दिशा देती
शब्दांत, कर्मांत, संशोधनात तेज त्यांचे उजळते
सुचित्रा ताईंच्या कार्यातून, आयुर्वेद उमगते”


आयुर्वेदाचा प्रदीर्घ इतिहास मानवाच्या आरोग्यपरंपरेशी घट्ट जोडलेला आहे. आधुनिक उपचारपद्धतींच्या गोंधळातही आयुर्वेदाचे वैज्ञानिक स्थान दृढ करणाऱ्या व्यक्तींमध्ये 'वैद्य सुचित्रा सुधाकर कुलकर्णी' हे नाव आदराने घेतले जाते. आयुर्वेद, पंचकर्म, योग, आहारशास्त्र, सौंदर्यचिकित्सा, लेखन, संपादन आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांचा संगम त्यांच्या योगदानातून सहज दिसून येतो.


कराड येथे जन्मलेल्या सुचित्राताईंना वक्तृत्व, वाचन, लेखन आणि समाजभानाचे संस्कार घरातूनच लाभले. सहकार क्षेत्रात सेवारत असणाऱ्या वडिलांच्या सतत होणाऱ्या बदल्यांमुळे अनेक शहरांचा अनुभव मिळाल्याने, नवीन ठिकाणी जुळवून घेण्याची सवय, निरीक्षणशक्ती आणि विविधतेचे भान त्यांच्या स्वभावात खोलवर रुजले. शालेय जीवनात गणित, भाषा, निबंधलेखन, वक्तृत्व, नृत्य, हस्ताक्षर, गायन अशा स्पर्धांमध्ये त्यांनी अनेक पारितोषिके पटकावली. वाचनाची सातत्यपूर्ण आवड ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची पायाभरणी ठरली. बारावीनंतर आयुर्वेदाची वाट निवडून त्यांनी एम. डी. (आयुर्वेद) पदवी संपादन केली. “आपल्या वाट्याला येणाऱ्या जबाबदाऱ्या आनंदाने स्वीकाराव्यात” हे जीवनमूल्य त्यांना कुटुंबातूनच शिकायला मिळाले•. BAMS झाल्यावर, जामनगर येथील आंतरदेशीय विद्यापीठातून त्यांनी एमडी पदवी संपादन केली. त्यांच्या शोधनिबंध सादरीकरणाला त्यावर्षी दुसरे बक्षीस मिळाले. जामनगरच्या या आयुर्वेद संस्थेत, त्यावेळी प्रवेश परीक्षेत भारतातून ओपन मेरिट मधून केवळ दहाच जणांना प्रवेश दिला जात असे. पुढे आपला स्वतंत्र व्यवसाय चालू केल्यावर बारा वर्षांनी, त्यांनी कालिदास विद्यापीठ रामटेक येथून, योग शास्त्रात बीए ही पदवी सुवर्णपदकासहित संपादन केली. ठाणे शहरात गेली २५ वर्षे त्यांनी यशस्वीपणे चालवलेले आयुर्वेद-पंचकर्म-सौंदर्य उपचार, आहार आणि योग मार्गदर्शन केंद्र हे नागरिकांसाठी विश्वासाचे ठिकाण ठरले•. आयुर्वेदातील शास्त्रशुद्ध दृष्टी, रुग्णांशी आत्मीय संवाद, उपचारातील शास्त्रशुद्ध नेमकेपणा, उपचार करताना रुग्णाच्या आर्थिक परिस्थितीचे भान यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाला विशेष विश्वसनीयता प्राप्त झाली. आरोग्यविषयक जागरूकतेसाठी त्यांनी ५०० च्या वर व्याख्याने दिली. याशिवाय आकाशवाणी अस्मिता, दूरदर्शन यावरील काही मुलाखतींतून देखील त्यांनी आयुर्वेदाचा प्रचार केला. त्यांच्या लेखन प्रवासाची सुरुवात कालनिर्णयच्या आरोग्यलेखांपासून झाली. त्यानंतर अनेक नामांकित वर्तमानपत्रांच्या माध्यमांत त्यांनी १००० हून अधिक लेख लिहिले. गुंतागुंतीचे वैद्यक विषय सुलभ भाषेत मांडण्याची हातोटी, त्यासाठी सांगितलेल्या गोष्टी आणि नर्म विनोदी शैली यामुळे आरोग्यासारख्या क्लिष्ट आणि नावडत्या विषयावरील त्यांचे लिखाण वाचकप्रिय ठरले. बालसाहित्यातही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांची काय मी खाऊ, डायरी व्यायामाची, तेजस्विनींच्या शौर्यगाथा, नरोत्तम अर्जुन, कुतूहल, सुभाषिते, आयडॉलचा आयडॉल इत्यादी पुस्तके बालसाहित्य क्षेत्रात लोकप्रिय ठरली. आयुर्वेदीय आहारमंत्र, सौंदर्यमंत्र, आरोग्यमंत्र, ओवी आरोग्याची, अशी वाढते स्मरणशक्ती ही त्यांची पुस्तके आज सर्व वयाच्या लोकांसाठी मार्गदर्शक ठरली आहेत. संपादन क्षेत्रातही त्यांचा दांडगा अनुभव आहे — आरोग्यम् या नियतकालिकाचे २० वर्षे संपादन, खजिना संचातील १५० पुस्तकांचे संपादन, आयुर्वेद व्यासपीठाच्या दैनंदिनी व पुस्तकांच्या निर्मितीचे प्रमुख दायित्व, प्रतिभा महिला विशेषांक संपादन अशा विविध विषयांत त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. “रुग्णांचे ६०% आजार शारीरिक तर उरलेले मानसिक असतात” हे सांगत त्या समुपदेशनाद्वारे अनेकांना मार्गदर्शन करतात. स्वामी वरदानंद भारती यांच्या साहित्याने अत्यंत प्रभावित झाल्याने त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाला नवी दिशा मिळाल्याचे त्या सांगतात. आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार हे ध्येय समोर ठेवून , बोली भाषेतून सहज सोप्या पद्धतीने केलेली विषयाची मांडणी, गोष्टी, किस्से यामधून प्रत्येक लेख हा आपल्यासाठीच लिहिला गेला असावा....असे वाचकाला वाटते. इतकं आपलंसं करणारं त्यांचं लेखनातील योगदान लक्षात घेता, त्यांना वैद्य खडीवाले प्रतिष्ठान यांचा वैद्य यादवजी त्रिकमजी लेखन पुरस्कार, मराठी विज्ञान परिषद वैद्यकीय लेखन पुरस्कार आणि आयुर्वेद विज्ञान मंडळाचा लेखन सन्मान अशा सन्मानित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे•. व्यावसायिकतेपेक्षा “रुग्णसेवा” हीच खरी साधना मानणाऱ्या सुचित्राताई आज पुण्यात स्थायिक असूनही रुग्णांसाठी ऑनलाईन सेवा देतात. रामकथा, भागवत, दासबोध, गीता, मनाचे श्लोक यांचा अभ्यास पुढे समाजापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे. वैयक्तिक जीवनातही सामाजिक भान, पर्यावरण संरक्षण, सार्वजनिक मालमत्तेची जपणूक त्या अत्यंत कटाक्षाने करतात. आयुष्यात येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाताना आपल्यासोबत आपले आई वडील, हितचिंतक, सद्गुरु आणि भगवंत कायम असतात असे त्यांचे मत आहे. ज्ञानदीपातून समाजाला दिला जाणारा आरोग्यप्रकाश. चिकित्सक, लेखक, संपादक, योगसाधक आणि संवेदनशील मार्गदर्शक अशा त्यांच्या बहुआयामी समर्पित कार्याने पुढील पिढ्यांना प्रेरणा दिली आहे• निरपेक्ष भावनेने कार्य करणाऱ्या या आयुर्वेद दीपिकेला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा•.
Vaishu.gaikwad78@gmail.com


Comments
Add Comment

कंदमुळांचं कालवण

सुग्रास सुगरण : गायत्री डोंगरे आता महाराष्ट्रात सगळीकडे थंडीची चाहूल लागली आहे. हिवाळ्यात शरीराला उबदार

महिलांसाठी योग - एक आनंदाची पर्वणी

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके हे शीर्षक वाचून खूप बरं वाटतं. कारण आनंद कुणाला नको आहे? परंतु असेही वाटेल की योग हा

गर्भावस्थेतील यकृतातील कोलेस्टेसिस

स्त्री आरोग्य : डॉ. स्नेहल पाटील गर्भावस्था ही स्त्रीच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची आणि आनंददायी अवस्था असली

फॅशन ट्रेंडी स्वेटरची!

सौंदर्य तुझं : प्राची शिरकर हिवाळ्याची चाहूल लागताच फॅशनच्या दुनियेत एक मोठी क्रांती झालेली दिसते. सध्याच्या

डिंकाचे प्रोटीन लाडू

सुग्रास सुगरण : गायत्री डोंगरे साहित्य : डिंक (गोंद) - अर्धा कप , खारीक पावडर - अर्धा कप,  बदाम - पाव कप,  काजू - पाव कप,

सुंदर मी होणार... भाग - २

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके मागील लेखात आपण अंतरंग सौंदर्याचा विचार करत होतो. अंतरंग सौंदर्य म्हणजे अंतःकरणाचं