Monday, November 24, 2025

दोन्ही राष्ट्रवादींची युती : पालकमंत्र्यांची सुस्ती

दोन्ही राष्ट्रवादींची युती : पालकमंत्र्यांची सुस्ती

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीत एक आश्चर्यकारक साम्य दिसत आहे, ते म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटांची प्रमुख नगरपालिका व नगर पंचायतीत झालेली युती. राजकारणात "कधीही एक न होणारे" म्हणून ओळखले गेलेले विरोधक आता हातात हात घालून मैदानात उतरले आहेत. या घडामोडींनी महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींकडे हादरे बसले आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात प्रकाश आबिटकर, सांगलीत चंद्रकांतदादा पाटील आणि साताऱ्यात शंभूराज देसाई यांच्या राजकीय असहाय्यतेबद्दल चर्चेला उधाण आले आहे.

ल्हापुरात कागल नगरपालिका ही सर्वात चर्चेतील रणभूमी ठरली आहे. हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे यांच्या ११ वर्षांच्या संघर्षावर पडदा टाकत अचानक झालेल्या शांततेने राजकीय समीकरणे बदलली. या युतीमागे अजित पवार नव्हे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट भूमिका असल्याचे मानले जाते. आता येथे या युतीविरुद्ध एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरून नेतृत्व करणार आहेत. चंदगड येथेही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असून हातकणंगले, शिरोळ व जयसिंगपूर येथे शिवसेनेचे राजेंद्र पाटील यड्रावकरविरुद्ध स्थानिक जुळवाजुळवीतून निर्माण झालेली समीकरणे शिंदे गटासाठीच डोकेदुखी ठरत आहेत. साताऱ्यात परिस्थिती अधिक गुंतागुंतीची आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई समर्थ असूनही जिल्ह्यात त्यांची पकड कितपत आहे याबाबत प्रश्न उपस्थित आहे. सातारा नगरपालिकेत भाजपच्या नेतृत्वाखाली शिवेंद्रराजे-उदयनराजे एकत्र येताच इतर पक्षांसाठी समीकरणे कठीण झाली आहेत. कराड नगरपालिका ही निवडणूक विशेष ठरली असून पृथ्वीराज चव्हाण यांनी ऐन वेळी मैदानात उतरून भाजपचे अतुल भोसले यांना अडचणीत आणले आहे. मलकापूर आणि पाटण येथेही दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येत असून देसाईंची भूमिका संभ्रमात टाकणारी ठरत आहे.

सातारा जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक देसाई हे पालकमंत्री आहेत. त्यांच्याशी जिल्ह्यातील नेत्यांचे कितपत जमते हे संशोधनाचा विषय. खुद्द पाटण या त्यांच्या बालेकिल्ल्यात नगरपालिकेची निवडणूक मात्र त्यांना नेहमीच अवघड जात असते. यावेळी देखील तशीच चिन्हे आहेत. सातारा नगरपालिका निवडणुकीत त्यांनी पॅनल उभे केले असले तरी भाजपच्या नेतृत्वाखाली दोन राजे एकत्र आल्याने आता इथे इतरांची डाळ शिजणे अवघड झाले आहे. बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या कन्येचा विवाह याच धामधुमीत होत आहे आणि त्या विवाहासाठी उदयनराजे यांना खास मुंबईत बनवलेला पोशाख घेऊन राजे भेटायला गेले. दोघांमधील स्नेहाचे व्हिडीओ विरोधकांना साताऱ्यातून दूर ढकलण्यास खूप कारणीभूत ठरू शकतात. इतके भावनिक वातावरण दोन्ही बाजूला आहे. कार्यकर्त्यांना यामध्ये चार पावले मागे यावे लागले तरी अनेकांनीही इथे स्वीकारले आहे. त्यांना बंडखोरी नाही करावी लागली आहे.

कराड नगरपालिका ही राज्यातील एक चर्चेत असणारी नगरपालिका. दिवंगत पी. डी. पाटील यांच्या रूपाने ७० वर्षे त्यांच्या नावाचा धबधबा इथे कायम होता मात्र यंदा विधानसभेला पराभूत झालेल्या बाळासाहेब पाटील यांनी कराड नगरपालिकेच्या राजकारणातून स्वतःला बाजूला ठेवत आपल्या गटाला प्रथमच नगरपालिकेच्या परिघाबाहेर ठेवले आहे. आजारपणामुळे दीर्घकाळ दिल्लीत असणारे पृथ्वीराज चव्हाण या ठिकाणी नेतृत्व करणार की नाही अशी भूमिका काही मंडळींकडून मांडली जात असतानाच ऐनवेळी उतरलेल्या चव्हाण यांनी कराडमधील विरोधकांची एकजूट केली. विधानसभेला आपल्या विरोधात काम केलेल्या मंडळींना सुद्धा बरोबर घेऊन भाजपचे नेते अतुल भोसले यांना मोठ्या प्रमाणावर आव्हान निर्माण केले आहे. नगराध्यक्ष पद खुले झाल्याने येथे इच्छुकांची संख्या साताऱ्याप्रमाणेच मोठी आहे आणि बाजी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. विधानसभेला बाजी मारलेले अतुल बाबा यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा यांना जड जाणार की, पृथ्वीराज बाबा त्यांच्याच सहकाऱ्यांकडून अतुल बाबांना मागे रेटणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

सांगली जिल्ह्यात जत नगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादींची एकत्र चाल राजकीय वादाचे केंद्र ठरली आहे. जयंत पाटील यांच्या राजकीय अस्तित्वाला मिळालेल्या धक्क्यामुळे त्यांनी स्थानिक स्तरावर अजित पवार गटाशी तडजोड केली की, त्यांना न विचारता युती झाली, यावर चर्चा रंगली आहे. जत येथे काँग्रेस भाजपला रोखण्यासाठी सज्ज होती; मात्र राष्ट्रवादीच्या युतीमुळे समीकरणे बदलली आहेत. ईश्वरपूर आणि अष्टा येथे जयंत पाटील विरुद्ध भाजप-शिंदे गट अशी थेट लढत आहे. अण्णा डांगे पुत्र विश्वनाथ आणि आनंदराव मलगुंडे यांच्यातील थेट सामना सांगली राजकारणातील नवे वळण म्हणून पाहिला जातो. तासगावात रोहित पाटील विरुद्ध संजय पाटील हे पारंपरिक समीकरण असून शेवटच्या क्षणी दोघांत अंतर्गत तडजोडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विटा आणि आटपाडीमध्ये भाजप विरुद्ध शिंदे शिवसेना पॅनेल असून आ. गोपीचंद पडळकर यांच्या सक्रियतेमुळे या दोन्ही नगरपालिका लक्षवेधी ठरत आहेत. तीनही जिल्ह्यांत सत्ताधारी भाजप व शिंदे शिवसेनेचे पालकमंत्री परीक्षेत उतरले असले तरी जनतेचा प्रतिसाद मोठा वाटत नाही. उलट दोन्ही राष्ट्रवादींच्या अनपेक्षित एकत्रीकरणामुळे महायुतीतील तणाव उघड झाला आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी दक्षिण महाराष्ट्रातील ही राजकीय चाचणी ठरणार आहे. परिस्थिती बदलली नसल्यास सत्ताधारी पक्षाला धोरणांचा पुनर्विचार करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, एवढे मात्र निश्चित. - प्रतिनिधी

Comments
Add Comment