Tuesday, November 25, 2025

अलिबाग-मुरुड बस सेवा ठप्प ; प्रवाशांचा खोळंबा

अलिबाग-मुरुड बस सेवा ठप्प ; प्रवाशांचा खोळंबा
नांदगाव मुरुड ( वार्ताहर): अलिबाग आगारातून मुरुडकडे जाणाऱ्या एसटी बस सेवेत मंगळवारी गंभीर गफलत पाहायला मिळाली. दुपारी तीन ते सव्वा सहा दरम्यान मुरुडसाठी एकही बस न सुटल्याने या मार्गावरुन प्रवास करणार्या प्रवाशांना तीन साडेतीन तास खोळंबून रहावे लागले. या ताणतणावामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला आणि त्यांनी वाहतूक प्रशासनाच्या या गलथान कारभारावर संतापासह नाराजी व्यक्त केली. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी तीन वाजल्यापासून सव्वा सहापर्यंत अलिबाग आगारात प्रवाशी बसची वाट पाहत उभे होते, परंतु मुरुडकडे जाणारी एकही बस फलाटावर आली नाही. अनेक प्रवाशांना कामावर, मुलांच्या शाळेत किंवा वैद्यकीय कारणास्तव मुरुडला जायचे होते. परंतु बस न सुटल्याने त्यांना त्रास सहन करावा लागला असे त्यांनी सांगितले. मुरुड आगार प्रमुख राहुल शिंदे यांनी याबाबत विचारणा केली असता, 'अलिबाग आगारातून मुरुडला जाणारी बस पाच वाजता सुटली आहे,' असा दावा केला. मात्र, प्रवाशांचा अनुभव आणि आगारातील परिस्थिती यानुसार बस वेळेवर निघालेली नव्हती. अलिबाग आगारात चौकशी केली असता तेथील अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार मुरुडकडे जाणाऱ्या बसेस मुख्यतः मुरुड आगारातून निघालेल्या असतात, अलिबाग आगाराची बस या मार्गावर नियमित निघत नाही. त्यामुळे प्रवाशांना वेळेवर मुरुडला पोहोचण्यासाठी अतिरिक्त व्यवस्था करावी लागते. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. प्रवाशांना वेळेवर माहिती देणे आणि वाहतूक व्यवस्थापन मजबूत करण्याची आवश्यकता असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे.यामुळे अलिबाग-मुरुड मार्गावर बस सेवा सुधारण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
Comments
Add Comment