Monday, November 24, 2025

कल्याण-डोंबिवली महापालिका भाजप स्वबळावर लढणार? रविंद्र चव्हाणांच्या विधानावरून महायुतीमध्ये पेच असल्याचे चिन्हं

कल्याण-डोंबिवली महापालिका भाजप स्वबळावर लढणार? रविंद्र चव्हाणांच्या विधानावरून महायुतीमध्ये पेच असल्याचे चिन्हं

डोंबिवली: डोंबिवलीत मनसे नगरसेवकाच्या प्रभागात विकासकामांचा शुभारंभ करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण काल (२३ नोव्हेंबर) उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करतानाचे चव्हाण यांचे विधान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. ‘कामे मार्गी लावण्यासाठी कमळ चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला मतदान करा, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले.

मागील अनेक दिवसांपासून मित्रपक्षांमध्ये सुरू असलेल्या धुसफुशीनंतर आता भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक विकास म्हात्रे यांना खिंडीत गाठण्यासाठी चव्हाण यांनी त्यांच्याच प्रभागात ‘शतप्रतिशत भाजप’चे आवाहन केले. पालिका निवडणुकीत महायुतीला मतदान करा, असे आवाहन करण्याऐवजी त्यांनी भाजपला मतदान करा असे सांगितले. तसेच "केंद्र आणि राज्याप्रमाणे महापालिकेत भाजपचे सरकार आले तर अनेक गोष्टी सहजपणे मार्गी लावता येतील" असे विधान केले. यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी भाजपने स्वबळाचा नारा दिला असल्याचे स्पष्ट होते.

गेली दहा वर्षे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या म्हात्रे यांनी आता शिवसेनेत प्रवेश केला आहे. रविंद्र चव्हाण यांनी प्रभागातील विकास कामांसाठी निधी देण्यात आखडता हात घेतल्यामुळे विकासकामे रखडल्याचे आरोप म्हात्रे यांनी केले होते. याच प्रकरणामुळे नाराजी व्यक्त करत चव्हाणांनी पालिका निवडणूकीत म्हात्रेंना आव्हान दिले असल्याचे लक्षात येते. तर यापूर्वी अनेकदा महापौर भाजपचा असावा म्हणून भाजप पदाधिकाऱ्यांनी महायुतीला विरोध केला होता. मात्र शिवसेनेने महापौर महायुतीचा असेल असे नमूद केले होते. मात्र डोंबिवलीत सुरू असलेल्या प्रचारावरून भाजप स्वबळावर लढणार असून महापौर पदासाठी कठोर प्रयत्न करणार असल्याचे दिसून येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा