Monday, November 24, 2025

किंग्ज सर्कल, वडाळा, कुर्ला वासियांची तुंबणाऱ्या पाण्याची समस्या काही दिवसांचीच

किंग्ज सर्कल, वडाळा, कुर्ला वासियांची तुंबणाऱ्या पाण्याची समस्या काही दिवसांचीच

अखेर माहुल पंपिंग स्टेशनसाठीची जमिन हस्तांतरीत

मिठागराची जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिका मोजणार साडेतेरा कोटी रुपये

आता माहुलच्याही कामाला लवकरच होणार सुरुवात

मुंबई (सचिन धानजी): मुंबईत पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याचा जलदगतीने निचरा व्हावा यासाठी महापालिकेच्यावतीने प्रस्तावित केलेली पंपिंग स्टेशनची कामे पूर्ण झाली असली तरी मोगरा नाला आणि माहुल खाडीवरील पंपिंग स्टेशनची कामे रखडलेली आहेत. माहुल खाडीवरील पंपिंग स्टेशनकरता मिठागराची जागा ताब्यात घेण्यावरून जो विलंब झाला आहे, ती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. या पंपिंग स्टेशनकरता खासगी मालकाला नुकसान भरपाई देत मिठागराची जागा हस्तांतरणाची सर्व प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आहे. त्यामुळे या महिन्यांतच ही जागा ताब्यात येवून माहुलमधील पंपिंग स्टेशनच्या कामाला सुरुवात होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे किंग्ज संर्कल, गांधी मार्केट, कुर्ला नेहरु नगरची पाणी तुंबण्याची भीती आता काही दिवसांचीच राहणार आहे.

२६ जुलैच्या महापुरानंतर ब्रिमस्टोवॅड अहवाल आणि चितळे समितीच्या शिफारशीनुसार २००८मध्ये मुंबईमध्ये एकूण आठ ठिकाणी पावसाळी पाण्याचा उपसा करणारी उदंचन केंद्र बनवण्याचा निर्णय घेतला होता. या आठपैंकी हाजी अली, ईला, लव्हग्रोव्ह, क्लिव्हलँड, ब्रिटानिया आणि गझदरबंध ही सहा उदंचन केंद्रांची कामे पूर्ण होवून ती कार्यान्वित झाली आहेत. परंतु मोगरा व माहुल या दोन ठिकाणच्या पर्जन्यजल उदंचन केंद्रांची कामे रखडलेलीच आहेत. मोगरा नाला आणि माहुल खाडीवरील पर्जन्य जल केंद्राच्या उभारणीसाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली असली तरी जागेचा वाद आहे. यातील माहुल खाडीवरील पंपिंग स्टेशनकरता वडाळा येथील एमबीपीटी मार्गावरील माहुल नाल्याच्या पातमुखावर मिठागराच्या जमिनीची निवड करण्यात आली आहे. यासाठीच्या जागेच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.

ही जागा मिठ उत्पादनाची असल्यामुळे मिठ उत्पादक मेसर्स हॉरमुझ सॉल्ट वर्क्स यांना मिठ उत्पादन न करता आल्यामुळे त्यांना होणाऱ्या व्यावसायिक नुकसान भरपाईसाठी १०.४७ कोटी रुपये देण्याची मागणी झाली होती . पुढे या कंपनीशी वाटाघाटी केल्यामुळे त्यांनी ८.३७ कोटी रुपये नुकसान भरपाई स्वीकारण्याचे मान्य केले आहे. या केंद्रासाठी सुमारे २४ हजार ९९५ चौरस मीटर एवढ्या भूखंडाचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे जमिनीचे मुल्य ५ कोटी रुपये निश्चित केले आहे. त्यामुळे जमिनीची किंमत आणि व्यावसायिक नुकसान भरपाई अशाप्रकारे १३.४० कोटी रुपये एवढे देवून ही जमिन पंपिंग स्टेशनकरता हस्तांतरीत करुन घेण्यात येत आहे.

या माहुलमधील पर्जन्य जल केंद्राच्या उभारणीमुळे किंग्ज सर्कल, गांधी मार्केट, वडाळा पूर्व आण् कुर्ला नेहरु नगर इत्यादी ठिकाणी पावसाळ्यामध्ये साचणाऱ्या तथा पूरसदृश्य परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल,असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या ठिकाणच्या जमिनीच्या संपादनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर या पंपिंग स्टेशनच्या कामाला सुरुवात केली जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment