सांगली : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा सांगलीत २३ नोव्हेंबर रोजी रविवारी होणारा विवाह सोहळा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. आनंदाच्या क्षणी शनिवारी अचानक स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची तब्येत बिघडली. त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना लगेचच सांगलीच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे स्मृतीने विवाह सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
या घटनेनंतर पलाश मुच्छल याचे देखील पित्त वाढले आणि व्हायरल इन्फेक्शन झाले. त्यालाही एका खासगी रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर तो हॉटेलवर परतला आहे.
ऐन लग्नाच्यावेळी स्मृतीच्या बाबांची आणि होणाऱ्या नवऱ्याची तब्येत बिघडल्याने घरात सध्या चिंतेचे वातावरण आहे. कुटुंबातील जवळचे नातेवाईक तोहीन मिश्रा यांनी सांगितले की, वडिलांची तब्येत पूर्णपणे सुधारल्यानंतरच विवाह सोहळा आयोजित केला जाणार आहे. मानधना आणि मुच्छल कुटुंबीयांनी एकत्रितपणे हा निर्णय घेत, चाहत्यांना कोणत्याही अफवा न पसरवण्याची आणि स्मृतीच्या वडिलांच्या लवकर स्वास्थ्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे.
सांगलीत गेल्या दोन दिवसांपासून भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू उपस्थित होते. आज दुपारी चार वाजता मुख्य विवाह सोहळा पार पडणार होता. सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यतादेखील व्यक्त केली गेली होती. मात्र प्रकृतीच्या अडचणींमुळे आजचा हा सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.






