संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे सूतोवाच
नवी दिल्ली : सध्या पाकिस्तानात असलेला ‘सिंध प्राप्त पुन्हा भारताचा भाग होऊ शकतो, असे वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी एका कार्यक्रमात बोलताना केले. ‘सीमा कधी बदलेल हे कोणी सांगू शकत नाही आणि उद्या सिंध भारताला पुन्हा परत मिळू शकते’, असे सांगताना त्यांनी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांच्या एका पुस्तकाचा दाखला दिला.
दरम्यान, ‘सिंध हा प्रदेश आज भारताचा भाग नसला तरी संस्कृतीनुसार तो नेहमीच भारताचा भाग राहील’, असे बोलताना, लालकृष्ण आडवाणी यांच्यासारख्या नेत्यांनी सिंध प्रदेश भारतापासून वेगळं होणं हे कधीही स्वीकारले नाही, याची पुन्हा आठवण करून दिली. ते म्हणाले, 'मी आज या ठिकाणी लालकृष्ण आडवाणी यांचा देखील उल्लेख करू इच्छितो. त्यांनी त्यांच्या एका पुस्तकात लिहिले आहे की, सिंधी हिंदूंनी विशेषतः त्यांच्या पिढीतील लोकांनी आजही सिंध प्रांत भारतापासून वेगळा होणे स्वीकारलेले नाही. केवळ सिंधमध्येच नाही, तर संपूर्ण भारतात हिंदू सिंधू नदीला पवित्र मानतात आणि सिंधमधील काही मुस्लीमदेखील सिंधू नदीला पवित्र मानत होते. असे त्यांनी सांगितले. सिंधूचे पाणी मक्केच्या आब-ए-जमजमपेक्षाही कमी पवित्र नाही. हे आडवाणींचे वाक्य आहे”, असे राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
“आज मी त्यांचा (आडवाणींचा) एक कोट सांगत आहे. आज सिंधची भूमी भारताचा भाग भलेही नसेल. पण सभ्यतेच्या दृष्टीने सिंध नेहमीच भारताचा भाग राहील. आता राहिली गोष्ट जमिनीची, तर सीमा कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही. कारण उद्या सिंध भारताला पुन्हा परत मिळू शकतं. सिंधू नदीला पवित्र मानणारे आपले सिंधचे लोक नेहमीच आपले असतील, मग ते कुठेही असले तरी”, असे सिंह यांनी सांगितले.






