मुंबई : मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीएला अनंत गर्जेला पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी तीन दिवसांची पोलीस कोठडी झाली आहे. याआधी मुंबई पोलिसांनी गौरी पालवे गर्जेच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा नोंदवला. यानंतर संशयित आरोपी म्हणून अनंत गर्जेला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी अटक केल्यानंतर अनंत गर्जेला न्यायालयात हजर केले. यावेळी पोलिसांनी अनंत गर्जेला दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने सर्व बाजू जाणून घेतल्यानंतर आरोपी अनंत गर्जेला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली.
मुंबईत केईएमच्या डेंटिस्ट विभागात कार्यरत असलेल्या डॉ. गौरी पालवे आणि अनंत गर्जे यांचे ७ फेब्रुवारी रोजी लग्न झाले होते. मात्र, अनंत गर्जे यांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे दोघांमध्ये सतत वाद होत होते. या वादामुळेच मानसिक ताण वाढत गेला. ज्या दिवशी अनंत गर्जे आणि अन्य महिलेचे चॅट बघितले त्यानंतर तर संबंध आणखी विकोपाला गेले. या सगळ्यातून आलेल्या नैराश्यामुळेच गौरी यांनी गळफास लावून घेतला आणि वरळीच्या घरी आत्महत्या केली. या घटनेनंतर वरळी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. अनंत गर्जे, त्याचा भाऊ आणि बहीण या तीन जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
गौरीने आत्महत्या केलेली नाही तिची हत्या झाली. या हत्येला अनंत गर्जे आणि त्याचे नातलगच जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप गौरीच्या आई-वडिलांनी केला आहे.






