मुंबई : भारतीय नौदलाची सामरिक ताकद अधिक भक्कम करणारा सोहळा सोमवारी पाहायला मिळणार आहे. माहे-क्लास अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट मालिकेतील पहिली युद्धनौका ‘आयएनएस माहे’ २४ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे कमिशनिंग करून नौदलात दाखल होणार आहे.या ऐतिहासिक समारंभाला लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, याचे अध्यक्षस्थान व्हाइस अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन (फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, पश्चिम नौदलकमांड) भूषवतील.
INS माहेच्या कमिशनिंगमुळे शॅलो वॉटर लढाऊ नौकांच्या नव्या स्वदेशी पिढीचे आगमन होणार आहे. हे जहाज संपूर्णपणे आकर्षक डिझाइन, वेगवान कार्यक्षमता आणि आधुनिक युद्धतंत्र यांनी सुसज्ज असून, ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर यामध्ये करण्यात आला आहे. भारताच्या युद्धनौका डिझाइन, बांधकाम आणि प्रणाली एकत्रीकरणातील प्रभुत्वाचा हा भक्कम पुरावा मानला जात आहे.
कमी खोलीच्या समुद्रातही शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध तत्काळ प्रत्युत्तर देण्याची क्षमता यामुळे पश्चिम समुद्रकिनाऱ्यावर एक 'सायलेंट हंटर' म्हणून कार्यरत राहणार आहे. समुद्री सुरक्षेत वाढत्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर हे जहाज नौदलासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.






