Monday, November 24, 2025

डॉ. गौरी पालवेच्या पार्थिवावर अनंत गर्जेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार; अंत्यसंस्कारादरम्यान वडिलांचा आक्रोश, "तुम्हाला मुली असतील तर आम्हाला न्याय द्या"

डॉ. गौरी पालवेच्या पार्थिवावर अनंत गर्जेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार; अंत्यसंस्कारादरम्यान वडिलांचा आक्रोश,

अहिल्यानगर : पंकजा मुंडे यांचा PA अनंत गर्जे याची पत्नी डॉ. गौरी पालवे गर्जेच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्यांच्या मूळगावी सोमवारी मोठा तणाव निर्माण झाला. गौरीने शनिवारी मुंबईतील राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना घडली होती.

प्राथमिक माहितीनुसार, अनंत गर्जे यांच्या कुटुंबीयांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आणि पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे गौरीने आत्महत्या केल्याचे समोर आले होते. मात्र, गौरींच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून खून असल्याचा आरोप करत संपूर्ण तपासाची मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

सोमवारी गौरीचे पार्थिव त्यांच्या मूळगाव मोहोज-देवढे (अहिल्यानगर) येथे आणण्यात आले. यावेळी पालवे कुटुंबीयांनी गौरींचे अंत्यसंस्कार अनंत गर्जे यांच्या घरासमोरच करावेत, असा आग्रह धरला. या मागणीवरून गर्जे आणि पालवे कुटुंबीयांमध्ये तीव्र बाचाबाची झाली. पोलिसांनी मध्यस्थी करत वाद शांत केला.

यानंतर अखेर अनंत गर्जेच्या घराशेजारीच डॉ. गौरीच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला. गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अंत्यसंस्कारादरम्यान गौरींचे वडील पोलिसांपुढे रडत रडत म्हणाले, “तुम्हाला मुली असतील तर आम्हाला न्याय द्या. तुमच्या मुली गरीबाला द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका. श्रीमंतीच्या भपक्यावर जाऊ नका.” हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.

सुरुवातीला पालवे कुटुंबीयांनी अनंत गर्जेला अटक झाल्याची माहिती मिळाली नसल्याने अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला होता. पोलिसांनी माहिती देत त्यांची समजूत काढल्यानंतर अंत्यसंस्कार पार पडले.

रविवारी रात्री १ वाजता वरळी पोलिसांनी अनंत गर्जेला अटक केली. गर्जे, त्याचा भाऊ आणि बहिणीवर डॉ. गौरी पालवे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे. आज अनंत गर्जेला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

काही वेळापूर्वीच पोलिसांचे एक पथक, डॉक्टर आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांसह, अनंत गर्जे यांच्या वरळीतील घराची झाडाझडती घेण्यासाठी पोहचले आहे. तपासादरम्यान महत्त्वाचा पुरावा सापडतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >