मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील तेजस्वी पर्वाला उजाळा देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण धर्मेंद्र यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीतल्या एका सुवर्ण अध्यायाचा अंत झाल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहताना म्हटले की, ब्लॅक अँड व्हाईटच्या काळापासून ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगापर्यंत धर्मेंद्र यांनी सातत्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. स्वप्नाळू आणि आत्मीय तरुण नायकापासून ते बलदंड, तडफदार व्यक्तिमत्त्वाच्या भूमिकांपर्यंत त्यांनी आपल्या अभिनयाने स्वतंत्र छाप उमटवली. कालांतराने ‘ही-मॅन ऑफ बॉलिवूड’ म्हणून मिळालेली त्यांची ओळख त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेची साक्ष देते.
शोलेमधील वीरूची मैत्री जशी पडद्यावर अजरामर झाली, तशीच मैत्री आणि जिव्हाळा जपणारी त्यांची स्वाभाविक वृत्ती वास्तवातही जाणवायची, असेही मुख्यमंत्री म्हणाले. जुन्या आणि नव्या दोन्ही पिढ्यांना जोडणारा सेतू म्हणून धर्मेंद्र यांच्याकडे पाहिले जात असे. अनेकांचे ते मार्गदर्शक, आधारस्तंभ आणि प्रेरणास्थान होते.
चित्रपटसृष्टीसोबतच त्यांनी बिकानेरचे लोकसभा प्रतिनिधित्व करत भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणूनही कार्य केले. मात्र अभिनय आणि सर्जनशील प्रयोगशीलता यांनाच त्यांनी सदैव महत्व दिले. तीनशेहून अधिक चित्रपटांत त्यांच्या बहुरंगी भूमिका पाहायला मिळतात. एकाच वर्षी नऊ हिट चित्रपट देण्याचा त्यांच्याकडे असलेला विलक्षण विक्रम आजही सिनेसृष्टीत अभिमानाने आठवला जातो.
आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत ते सिनेसृष्टीत सक्रिय राहिले, हा त्यांचा व्यासंग आणि समर्पणाचा सर्वोच्च नमुना असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. धर्मेंद्र यांच्या निधनाने देओल कुटुंबीयांसह कोट्यवधी चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या दुःखात आम्ही मन:पूर्वक सहभागी आहोत आणि ईश्वर सर्वांना धैर्य देओ, अशी प्रार्थना करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.






