Monday, November 24, 2025

भाजपचा मोठा निर्णय; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तरुणांना प्राधान्य

भाजपचा मोठा निर्णय; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तरुणांना प्राधान्य

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे जोरदार वाहू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला गती दिली आहे. आता भाजपने देखील एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून, निवडणुकीची समीकरणे बदलण्याची चिन्हे यामुळे दिसू लागली आहेत.

मुंबईतील एका कार्यक्रमात तरुणांसोबत संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की, “आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप ३५ वर्षांखालील तरुणांना कमीत कमी ४० टक्के तिकिटे देणार आहे.” युवाशक्तीवरचा विश्वास आणि पक्षातील नव्या नेतृत्वाला संधी देण्याच्या दिशेने हा मोठा निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपच्या या भूमिकेमुळे सध्याच्या अनेक पदाधिकाऱ्यांची तिकीट कापले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महानगरपालिका, जिल्हा परिषद ते पंचायत समिती या सर्व पातळ्यांवरील निवडणुकांमध्ये हा नियम लागू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेला भाजपचा हा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार असून, युवा नेतृत्वाला पुढे आणण्यासाठी केलेला हा प्रयत्न किती यशस्वी ठरतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी निवडणूक

महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी ३ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. एकूण ६,८५९ जागांसाठी मतदान होणार आहे. २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठी थेट पद्धतीने निवडणूक होईल. नगरपालिकांसाठी दोन सदस्यीय प्रभाग पद्धत तर नगरपंचायतींसाठी एक सदस्यीय प्रभाग पद्धत आहे. नगरपालिकांमध्ये मतदारांना नगराध्यक्षपदासाठी एक तर प्रभागासाठी दोन अशी तीन मते द्यावी लागणार आहेत. नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्ष व सदस्यपदासाठी प्रत्येकी एक अशी दोन मते द्यावी लागतील. उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. यामुळे मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांची निवडणूक कधी होणार हा प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे.

नगरपालिका : २४६

नगरपंचायती : ४२

एकूण जागा : ६,८५९

अर्ज दाखल प्रक्रिया : १० ते १७ नोव्हेंबर

अर्ज माघार : २१ नोव्हेंबरपर्यंत

मतदान : २ डिसेंबर

मतमोजणी : ३ डिसेंबर

विभागनिहाय नगरपालिका व नगरपंचायती

कोकण : २७, नाशिक : ४९, पुणे : ६०, छत्रपती संभाजीनगर : ५२, अमरावती : ४५, नागपूर : ५५

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा