नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे
पुनर्जन्म हा विषय भारतीय समाजमनाला ओळखीचाही आहे आणि प्रियही! पूर्वी या विषयावर अनेक सिनेमा येऊन गेले. त्यातला ‘महल’(१९४९) हा अशोककुमार आणि मधुबालाच्या प्रमुख भूमिका असलेला हिंदीतला पहिला सिनेमा होता. या विषयावरचा जगातला पहिला सिनेमा आला होता अमेरिकेत, ‘मम्मी’ या नावाने, १९३२ साली! हिंदीत तर असे अनेक सिनेमा येऊन गेले आणि बहुतेक कमालीचे लोकप्रियही झाले.
‘मिलन’(१९६७), ‘नील कमल’(१९६८), ‘मेहबूबा’ (१९७६), ‘कर्ज’(१९८०), ‘कुदरत (१९८१) हे त्यातले प्रमुख. अगदी अलीकडेही या विषयाने अनेकांना मोह पाडला होता. ‘करण - अर्जुन(१९९५), ‘हमेशा’(१९९७), ‘ओम शांती ओम’(२००७), ‘राबता’(२०१७), ‘हाऊसफुल्ल ४’ (२०१९), तेलुगूमधला ‘शाम सिंघ रॉय’ (२०२१) हे नवे चित्रपटही पुनर्जन्माच्या कथानकांवरचेच होते!
हिंदीत १९५८ला आलेला दिलीपकुमार आणि वैजयंतीमालाच्या प्रमुख भूमिका असलेला ‘मधुमती’ चांगलाच गाजला. ‘मधुमती’ला फिल्मफेयर पुरस्कार समारंभात एकूण १२ नामांकने मिळाली होती. प्रत्यक्षात त्याने ९ पुरस्कारही पटकावले. हा विक्रम पुढील ३७ वर्षांत कुणीही मोडू शकले नव्हते. पुढे १९७६ साली मधुमतीचा मल्ल्याळम भाषेत ‘वनदेवता’ या नावाने रिमेकही आला होता.
या सिनेमाच्या लोकप्रियतेचे एक कारण हेही होते की, त्यातली सर्व गाणी कमालीची लोकप्रिय झाली. आजही ती जुन्या रसिकांच्या ओठावर आहेत. मुकेश आणि लतादीदीने गायलेले ‘दिल तडप तडपके कह रहा है आ भी जा’, लतादीदीने अजरामर करून ठेवलेले ‘आ जा रे परदेसी, मैं तो कबसे खडी इस पार’ पुन्हा तिचेच ‘चढ़ गयो पापी बिछुआ’ ‘घडी घडी मेरा दिल धडके’ ‘जुल्मीसंग आंख लडी’, दिलीपकुमारसाठी रफीसाहेबांनी गायलेले ‘टूटे हुए ख्वाबोंने हमको ये सिखाया हैं’ आणि जॉनी वॉकरसाठी गायलेले काहीसे विनोदी ‘जंगलमे मोर नाचा, किसीने ना देखा’ अशी एकापेक्षा एक गाणी लोकांनी पसंत केली होती. त्या वर्षी बिनाका गीतमालाच्या वार्षिक क्रमवारीत मुकेशने गायलेले ‘सुहाना सफर और ये मौसम हंसी’ ५ व्या क्रमांकावर वाजले होते.
मधुमतीची कथा काहीशी गूढरम्य होती. देवेंद्र (दिलीपकुमार) एका टिम्बर इस्टेटवर मॅनेजर असतो. त्याचे जवळच्या आदिवासी वस्तीतील मधुमती (वैजयंतीमाला) नावाच्या मुलीवर प्रेम बसते. इस्टेटचा मालक राजा उग्र नारायण (प्राण) एक अतिशय उर्मट आणि क्रूर हुकूमशहा असतो. त्याचे देवेंद्रशी भांडण होते. तो मधुमतीच्या मृत्यूलाही कारण होतो. त्यानंतर देवेंदचाही मृत्यू होतो.
कालांतराने दोन्ही प्रेमिकांचा आनंद आणि राधा या नावाने पुनर्जन्म होतो आणि अनेक नाट्यमय घटना घडून उग्रनारायण पोलिसांच्या ताब्यात दिला जातो. शेवटी मागील जन्मीच्या प्रेमींचे या नव्या जन्मात पुनर्मिलन होते अशी ही दिग्दर्शक बिमल रॉय यांनी रंगवलेली गूढरम्य सुखांतिका. गंमत म्हणजे मधुमतीचे संकलन केले होते - पुढे अतिशय मोठे दिग्दर्शक बनलेल्या - हृषिकेश मुखर्जी यांनी! त्यांना त्यावर्षी या कामाबद्दल सर्वोत्कृष्ट संकलनाचे फिल्मफेयर पारितोषिकही मिळाले होते.
या चित्रपटाने संगीत दिग्दर्शक सलील चौधरी यांना त्यांचे पहिले फिल्मफेयर पारितोषिक मिळवून दिले ते शंकरदास केसरीलाल ऊर्फ ‘शैलेन्द्र’ यांच्या लेखणीतून उतरलेल्या मुकेशच्या नितळ आवाजातल्या “सुहाना सफर और ये मौसम हसीं” या गाण्याने! सलीलदांनी काफी रागात या गाण्याची स्वररचना केली होती. शैलेन्द्रजींचे आजही अनेकांना पाठ असलेले ते सदाहरित शब्द होते -
‘सुहाना सफ़र और ये मौसम हसीं
हमें डर है, हम खो ना जाए कहीं
सुहाना सफ़र और ये मौसम हसीं...’
नव्यानेच नैनितालच्या एका निसर्गरम्य टिंबर इस्टेटवर मॅनेजर म्हणून नोकरी मिळालेला देखणा दिलीपकुमार मजेत कामावर निघाला आहे. डोंगरदऱ्यातून आनंदात तो स्वत:शीच गुणगुणत चालतो आहे. त्याच्या मनात तारुण्यासुलभ अशी अनेक स्वप्ने तरळत असलेली आपल्याला दिसतात. जसे त्या वयात शृंगारिक प्रेमाची अनावर ओढ प्रत्येक युवामनाला लागलेली असते तसेच त्याच्याही मनात सुरू असल्याने त्याला रानफुलांच्या मागे लपून जणू कुणीतरी हसते आहे असा भास होतो. अवघ्या आसमंतात कुणाच्या तरी मधुर गुणगुणण्याची धून सतत ऐकू येत राहते. कुणा सुंदरीच्या पायातले पैंजण रुणझुण वाजत आहेत असाही भास होतो आणि त्याच्या तोंडी शब्द येतात -
‘ये कौन हँसता है फूलोंमें छुपकर?
बहार बैचेन है किसकी धुनपर?
कहीं गुनगुन, कहीं रुनझुन
के जैसे नाचे ज़मी
सुहाना सफर और ये मौसम हसीं ’
त्या वयात उपजीविकेची शाश्वती मिळणे, एक चांगली मानाची नोकरी मिळणे ही मोठी अचिव्हमेंट वाटत असते. आपोआप पुढची स्वप्ने मनात तरळू लागतात. सगळीकडे आपल्याभोवती कुणीतरी आहे, हळुवारपणे वावरते आहे असे भासू लागते. मग खळखळ वाहणारे डोंगरातले झरेसुद्धा एखाद्या सुंदर अल्लड षोडशेसारखे धावत आहेत असे वाटते. तेही कसे? तर आपल्या प्रियकराला भेटून त्या आगळ्याच आनंदात उड्या मारत परत निघालेल्या प्रेयसीसारखे! तसेही सगळे जग किती सुंदर भासत असते त्यावेळी! जणू आसपासच्या प्रत्येक दृश्याला एक नवी झळाळीच प्राप्त झाली आहे असे वाटू लागते -
‘ये गोरी नदियोंका चलना उछलकर,
के जैसे अल्हड़ चले पीसे मिलकर.
प्यारे-प्यारे ये नज़ारें, निखार है हर कहीं.
सुहाना सफर और ये मौसम हसीं.’
त्याच्या मनात तारुण्यातील अनामिक उन्मुक्त आनंदाच्या लाटांवर लाटा उसळत आहेत. मग अतिशय आनंदी, उत्साही मन:स्थितीतला दिलीपकुमार सगळीकडे यौवनातील ते बेधुंद प्रेम आणि त्यातून स्वाभाविकपणे जुळून येणाऱ्या संभाव्य मिलनाची कल्पनाचित्रे मनात रंगवू लागतो. आपल्या जीवनातली सगळी स्वप्ने इथेच पूर्ण होतील असे त्याला वाटू लागते -
‘वो आसमाँ झुक रहा है ज़मींपर,
ये मिलन हमने देखा यहींपर.
मेरी दुनिया, मेरे सपने
मिलेंगे शायद यहीं.
सुहाना सफर और ये मौसम हसीं..’
हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळात लंकेच्या राज्याप्रमाणे सगळेच सोन्याचे होते - संवाद, कथानक, अभिनय, गाणी, संगीत आणि वातावरण. जुनी गाणी ऐकणे, त्यांचा तबियतने आस्वाद घेणे म्हणजे त्या सुवर्णनगरीला दिलेली एक धावती भेटच असते. म्हणून तर गेली ९ वर्षे सुरू असलेला आपला हा ‘नॉस्टॅल्जिया’!